आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारी कृत्रिम बुद्धिमत्ता पुढील दशकभरात अनेक आजारांवर उपचार म्हणून उपयोगात येऊ शकणार आहे. यासंदर्भात जगभरात संशोधन सुरू असून मज्जासंस्थेचा विकार (पार्किन्सन्स) किंवा लकव्यासारख्या आजारांमध्ये मेंदूतील कमकुवत होणाऱ्या पेशी सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे भाकीत सिंग्युलॅरिटी विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचे प्रमुख नील जॅकोबस्टिन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना वर्तविले.

आज जगभरात अनेक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. याचा सर्वाधिक वापर हा उद्योगांमध्ये होत आहे. यामुळे अधिक माणसे बरोजगार होतील का?, यामुळे माणसाच्या बुद्धिमत्तेवर आघात तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. हे प्रश्न वास्तववादी असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाचे कोणतेही नुकसान होणार नसून फायदाच होणार असल्याचेही जॅकोबस्टिन यांनी नमूद केले. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर हवामान बदल, आरोग्य, पारदर्शी व्यवस्था उभी करणे अशा अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो.

मुंबईत दोन दिवसीय ‘इंक टॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जॅकोबस्टिन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत मार्गदर्शन केले. आज समाजातील अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. भारतात सामाजिक बदल घडवून आणण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता काय भूमिका पार पाडू शकेल याबाबत विचारले असता जॅकोबस्टिन म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. याच बरोबरीला सामाजिक सक्षमीकरणासाठीही कृमित्र बुद्धिमत्तेचा वापर केला असता देशाच्या विकासात याचा फायदा होऊ शकतो. आज अमेरिकेत भ्रष्टाचार आहे. भारतात तर तो फोफावलेला आहे. यामुळेच आजही भारत चीनसारख्या देशांपेक्षा मागे आहे.

मानसिकता बदलणे आवश्यक..

देशातील या सर्वात मोठय़ा समस्येवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे उत्तर मिळवता येऊ शकते. इतकेच काय तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करू शकेल. मात्र हे सर्व करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी यंत्राबद्दलची भीती घालविणे महत्त्वाचे असल्याचेही जॅकोबस्टिन यांनी नमूद केले.