मुंबई : विलेपार्ले येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिर पाडल्यामुळे जैन समुदायाने आणि त्यापेक्षाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोठा विरोध केला आहे. पण या सगळ्यांना एका गोष्टीचा विसर पडला आहे. हे मंदिर ज्या गृहनिर्माण संकुलाच्या आवारात आहे, त्यांना गेली ४० वर्षे अंशत: भोगवटा प्रमाणपत्रावरच तहान भागवावी लागत आहे. हे मंदिर न हटवल्यामुळे पूर्ण भोगवटा प्रमाणपत्रासाठी नेमिनाथ सोसायटीचा गेली किमान ४० वर्षे लढा सुरूच असून सोसायटीच्या सदस्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप येथील सदस्यांनी केला आहे.
विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल मार्गावरील नेमिनाथ सोसायटीच्या आवारातील जैन मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन वादात सापडले आहे. नेमिनाथ सोसायटीचा पुर्नविकास करताना १९७४ मध्ये इमारत प्रस्ताव विभागाने या इमारतीचे आराखडे मंजूर केले होते. मंजूर आराखड्यानुसार सोसायटीच्या आवारातील मंदिर तोडण्याचे प्रस्तावित होते. मात्र विकासकाने हे बांधकाम काढले नाही. परंतु, या जागेचा एफएसआय वापरला. विकासकाने मंदिराचे बांधकाम न हटवल्यामुळे या संकुलाला अद्याप पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.
पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना विविध प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे. गेली अनेक वर्षे या प्रकरणी न्यायालयात विविध खटले सुरू आहेत. नगर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. मात्र या न्यायालयीन खटल्यांमुळे नेमिनाथ सोसायटीला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही, असा आरोप नेमिनाथ सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य नरेंद्र कनाकिया यांनी केला आहे.
मंजूर आराखड्यानुसार हे मंदिर ज्या जागेवर आहे ती मनोरंजन या कारणासाठीची आहे. पुनर्विकास करताना १५ टक्के जागा मनोरंजन कारणासाठी राखीव ठेवली जाते. या जागेवर क्लब उभारता येतो, पण मंदिर उभारता येत नाही. मात्र विकासकाने ही जागा मोकळी न केल्यामुळे सोसायटीला त्या जागेचा वापरही करता येत नाही आणि पूर्ण भोगवटा प्रमाणपत्रही नाही, अशी दुहेरी अडचण झाल्याचे कनाकिया यांनी सांगितले.
विकासकाचा मुलगा मंदिराचा विश्वस्त
१९७७ मध्ये इमारत बांधकाम झाल्यावर विकासकाने हे बांधकाम हटवणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्या जागेत आधी कार्यालय थाटले. मग कार्यालयात देव मांडले. मग त्या कार्यालयात जैन धर्मगुरू येऊ लागले आणि मग हळूहळू त्याचे मंदिरात रुपांतर झाले, असा आरोप सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. या इमारतीच्या विकासकाचा मुलगा या मंदिराचा विश्वस्त असून सोसायटीवर त्याचा दबाव असतो, असा आरोप कनाकिया यांनी केला आहे.
सोसायटीला अंशत: भोगवटा प्रमाणपत्र
भोगवटा प्रमाणपत्र नेमिनाथ गृह संकुलात तीन मजल्याच्या एकूण पाच इमारती आहेत. या इमारतीत मिळून सुमारे ५० सदनिका आहेत. तर तळमजल्यावर ५० ते ६० दुकानांचे गाळे आहेत. पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे सोसायटीने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती व हा न्यायालयीन खटला गेली अनेक वर्षे सुरू आहे. यादरम्यान सोसायटीला अंशत: भोगवटा प्रमाणपत्र (पार्ट ओसी) देण्यात आले. परंतु, अद्याप तळमजल्याला हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतीला जास्त दराने पाणीपट्टी, मालमत्ता कर भरावा लागतो.