मुंबई : महाजलप्रलयामुळे नेपाळमधील रस्ते, पूल व वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मुंबईतील ५९ पर्यटक अडकले आहेत. याशिवाय ‘रिचा टुर्न्स अँड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून गेलेल्या ६१ पर्यटकांशीही अद्याप संपर्क झालेला नाही. यात मुंबईतील दोन नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे. यामुळे मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन विभागात व बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अंधेरीतील डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे नेपाळमध्ये अडकले आहेत. डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागाचे सल्लागार आणि प्रमुख आहेत. तर डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख, तसेच वरिष्ठ सल्लागार आहेत. मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या टूर कंपनीमार्फत ते नेपाळला पर्यटनासाठी गेले आहेत.

डॉ. देशपांडे यांची भाची मैथिली मुंडलेने माहिती दिली की, कुटुंबियांचे त्यांच्याशी बुधवारी सकाळी ८.२८ वाजता शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर नातेवाइकांनी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यांना व्हॉटस्अप संदेश पाठवल्यानंतर केवळ एकच ‘टिक’ दिसत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याशीही संपर्क झालेला नाही.

मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल्स’च्या ५९ व ‘कपिल टूर्स’च्या माध्यमातून ६१ पर्यटक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. सर्व पर्यटक गुरुवारी सकाळी तिबेटच्या बाजूला असलेल्या कस्टम्स व इमिग्रेशन इमारत परिसरात उपस्थित होते. त्याच वेळी त्या परिसराला भीषण महापुराचा जोरदार फटका बसला. पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे संपूर्ण इमिग्रेशन इमारतच वाहून गेली.

मदतीसाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क

नेपाळमध्ये आणखी किती मुंबईकर आणि महाराष्ट्रातील पर्यटक अडकले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. ज्या पर्यटकांचा संपर्क होत नाही, त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ जिल्हा आपत्कालीन केंद्र किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

३० वर्षांपेक्षा जास्त काळ हिमालयात भ्रमंती करणारे मुंबईतील ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही यात समावेश आहे. डॉ. चितळे यांनी वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण केल्यानंतर गिर्यारोहणाला आपले आयुष्य समर्पित केले. मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल’ या त्यांच्या ट्रेकिंग संस्थेच्या माध्यमातून सुमारे ४० भाविकांचा समूह कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेला होता. या गटामध्ये डॉ. चितळे, त्यांच्या पत्नी जान्हवी चितळे आणि मुंबईतील अनेक नामांकित नागरिक सहभागी होते. महापुरानंतर या संपूर्ण समूहाशी संपर्क तुटला आहे.

३ हजार ट्रेक्सचा अनुभव

डॉ. मिलिंद चितळे (वय ६० हून अधिक) यांनी १९८३ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. मात्र, निसर्ग आणि गिर्यारोहणाच्या आवडीमुळे त्यांनी १९९७ मध्ये ‘हिल्स अँड ट्रेल’ची स्थापना केली. त्यांनी हिमालयात ३ हजारांहून अधिक ट्रेक्स आणि मोहिमा पूर्ण केल्या असून कांचनजंगा पर्वतावर २३ हजार फुटांपर्यंत चढाई केली आहे. पर्वत बचाव तंत्र व प्रथमोपचारावर त्यांनी पुस्तकही लिहिले असून २००५ मध्ये त्यांना ‘गिरिमित्र पुरस्कारा’ने सन्मानित केले होते. त्यांनी आतापर्यंत २५ हून अधिक वेळा कैलास-मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

इमिग्रेशन सेंटरजवळ असताना चेतनाशी संवाद झाला होता. एका सहप्रवाशाचा पासपोर्ट काठमांडूमध्ये राहिल्यामुळे ते सर्वजण थांबले होते. त्यानंतर संपर्क तुटला, असे बेपत्ता असलेल्या चेतना गुप्ता यांचे पती आनंद गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान, सध्या गुप्ता कुटुंबातील तीन सदस्य माहिती घेण्यासाठी काठमांडूमध्ये दाखल झाले आहे.