मुंबईः नेपाळमधील महापुरात बेपत्ता झालेल्या राज्यातील ६७ पर्यटकांचा पंधरा दिवसानंतरही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी अस्वस्थ कुटुंबियांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. तर राज्य सरकारने बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी डीएनए नमुने गोळा करुन नवी दिल्लीतील मध्यवर्ती न्यायवैधक प्रयोगशाळेला पाठविले आहेत.

नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरात हजारो पर्यटक,स्थानिक नागरीक वाहून गेले आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राज्यातील अनेक भाविक आणि पर्यटक या नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडले आहेत. या आपत्तीमध्ये राज्यातील ४०६ पर्यटक अडकले होते. त्यातील ३३९ पर्यटक सुखरुपपणे राज्यात परतले आहेत. तर अजूनही ६७ पर्यटक बेपत्ता आहेत. त्याच्या शोधासाठी आणि मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

नेपाळ पूर दुर्घटनेत राज्यातील बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी राज्य आपत्कालीन केंद्रामार्फत कलिना येथील न्यायवैधक प्रयोगशाळा आणि राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या समन्वयाने डीएनए नमुने गोळा करून, निर्धारित स्वरूपात प्रोफाइल तयार करून दिल्लीतील मध्यवर्ती न्यायवैधक प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. तसेच नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांच्या मोबाईलचे शेवटचे ज्ञात लोकेशन मिळवण्यासाठी दूरसंचार विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबियांसोबत व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन सर्व शक्य अनुषंगिक तक्रारींचे राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर निपटारा करण्यात येत असल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

त्याचप्रमाणे बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांकडून मिळणारी माहिती सर्व संबंधित यंत्रणांना तात्काळ कळविण्यात आली असून बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी तात्काळ मदत मिळण्यासाठी पर्यटकांच्या कुटुबियांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले आहे. कुटुंबियांनी मेलद्वारे पंतप्रधानांना मदत करण्याची तसेच नेपाळ सरकारलाही साह्य करण्याची विनंती केली आहे.