मुंबई : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक अडकले आहेत. त्यापैकी ३३८ नागरिक सुरक्षित असून नागपुरचे १०५ पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. तर ३७ पर्यटक सागा (मानसरोवरजवळ) येथून शनिवारी इंडिगोच्या ६ ई ११५८ विमानाने मुंबईत दाखल झाले. शनिवारी संध्याकाळपर्यत १४२ पर्यटक राज्यात सुखरुप आले आहेत. मात्र ६६ पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप घेतले. रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून नागरिक वाहून गेले, तर अनेकांची घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले. नेपाळ-तिबेट सीमेवरील महापुरामुळे ३२० भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय सुमारे ४०० भारतीय चीनच्या बाजूला अडकले आहेत. ते सुरक्षित असून कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे.
शनिवारी सकाळी १० पर्यंत नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांची संख्या ४०४ वरच आहे. यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याचे समजले. रिचा टूर्स प्रा.लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० जणांचा अद्याप संपर्क झालेला नाही. इतर ६ नागरिकांची माहिती लिंकद्वारे प्राप्त झाली असून त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट प्रदेशात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी मिळाली आहे. या यादीतील नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील असल्याने त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
३७ पर्यटक इंडिगोच्या विमानाने मुंबईत दाखल
नेपाळमधील महापुरात अडकलेले रायगड जिल्ह्यातील अलिबागचे ३७ पर्यटक आणि कैलास मानसरोवर यात्री सुखरूप इंडिगोच्या विमानाने शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. नेपाळमधील भीषण पुरामुळे हे सर्व पर्यटक सागा आणि काठमांडू परिसरात अडकले होते. स्थानिक प्रशासन व नेपाळमधील मदतकार्यानंतर त्यांना रस्तेमार्गे काठमांडू ते गोरखपूर आणण्यात आले. तिथून पुढे इंडिगोच्या विमानाने ते सुखरूप मुंबईत पोहोचले.
