मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना त्यात स्थान देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांची युवा सेनेच्या कार्यकारिणीवर वर्णी लावण्यात आली आहे. या कार्यकारिणीत शिंदे गटातील मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे यांच्या मुलांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.  त्याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> दसरा मेळाव्यावरून राजकारण; शिवसेना, शिंदे गटात गर्दीचे दावे-प्रतिदावे

हेही वाचा >>> स्वच्छ, सुंदर, कचरामुक्त शहरे लोकचळवळ व्हावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा

शिंदे गटाने त्यांच्या युवासेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात उत्तर महाराष्ट्रातून आविष्कार भुसे, मराठवाडय़ातून अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील, कोकण पट्टय़ात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे, पश्चिम महाराष्ट्रातून किरण साली, सचिन बांगर, कल्याण-भिवंडीतून दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक यांना कार्यकारिणीवर घेण्यात आले आहे. ठाणे, नवी मुंबई व पालघरमधून नितीन लांडगे, विराज म्हामूणकर, मनीत चौगुले, राहुल लोंढे, मुंबईतून समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे आणि विदर्भातून ऋषी जाधव, विठ्ठल सरप-पाटील यांना संधी देण्यात आली आहे.