मुंबई : गोरेगावस्थित नेस्को येथे आयोजित संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्युप्रकरणी अटक केलेल्या नेस्कोच्या दोन अधिकाऱ्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपली अटक बेकायदा असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.

लाइव्ह इव्हेंट्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सनी जैन (३१) तसेच लाइव्ह इव्हेंट्स आणि आयपीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण बलराम कुरुप (४६) यांना १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून बोरीवली दंडाधिकाऱ्यानी १८ एप्रिल रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दोघांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) तरतुदींतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

प्रकरणाशी संबंध नाही

संगीत कार्यक्रमादरम्यान, आपण व्यावसायिक कर्तव्ये पार पाडत होतो आणि कोणत्याही कथित अमली पदार्थांशी संबंधित कृत्यात आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नव्हता, असा दावा जैन आणि कुरुप यांनी याचिकेत केला आहे. प्रतिबंधित अमली पदार्थांची खरेदी, वितरण किंवा सेवन यांच्याशी त्यांचे संबंध जोडणारा कोणताही पुरावा नसल्याचा दावाही दोघांनी याचिकेत केला आहे. तसेच, तिकिटांवर छापलेल्या आणि कार्यक्रमस्थळावरील प्रवेश अटींनुसार, त्या ठिकाणी अवैध पदार्थांचे सेवन किंवा ते बाळगण्यास सक्त मनाई होती. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नव्हती, असे जैन आणि कुरूप यांनी याचिकेत म्हटले आहे.

अटकेची कारणे सांगितली गेली नाहीत

कायद्यानुसार आवश्यक असलेली अटकेची कारणे आपल्याला कळवण्यात आली नाहीत, असा दावा जैन यांनी केला आहे. तर न समजणाऱ्या मराठी भाषेत आपल्याला अटकेची कारणे सांगण्यात आली आणि विनंती करूनही ती आपल्याला समजावून सांगितली गेली नाहीत, असा दावा मल्याळम भाषिक कुरुप यांनी याचिकेत केला. असे करणे घटनात्मक संरक्षणाचे उल्लंघन असल्याचेही दोघांनी याचिकेत म्हटले आहे. कुरुप यांनी सततच्या उपचारांसाठी वैद्यकीय स्थितीचाही संदर्भ जामिनाची मागणी करताना दिला आहे.