राज्यातील नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांना पुढील आठवडय़ात शासन निर्णय लागू होईल, त्या दिवसापासून सेवेत सर्व अटी शर्तीसह कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्याचा लाभ २३०७ प्राध्यापकांना होणार असून त्यांना आता नेट-सेट परीक्षा द्यावी लागणार नाही. नियुक्तीच्या तारखेपासून सेवेत कायम करून सर्व आर्थिक लाभ देण्याची प्राध्यापकांच्या संघटनेची मागणी राज्य शासनाने फेटाळली आहे.
नेट-सेट परीक्षा न दिलेले ७६५७ प्राध्यापक १९९१ ते ९९ या काळात राज्यभरातील पदवी महाविद्यालयात नेमले गेले. विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिव्याख्यात्यांसाठी नेट किंवा सेट परीक्षा सक्तीची केल्याने त्यांच्या सेवा अनियमित राहिल्या. त्यांना बेसिक वेतनश्रेणी आणि दरवर्षी वेतनवाढीचा लाभ दिला गेला. मात्र नेट-सेट परीक्षा दिलेल्या प्राध्यापकांची वेतनश्रेणी व आर्थिक लाभ देण्याची त्यांची मागणी होती. पुढील काळात अन्य प्राध्यापकांनी सेट-नेट किंवा पीएचडी केल्याने त्यांच्या सेवा त्या तारखेपासून नियमित झाल्या. पण २३०७ अधिव्याख्याते सेट-नेट उत्तीर्ण झाले नाहीत. त्यांचा गेली काही वर्षे लढा सुरू होता. विद्यापीठाने व राज्य शासनाने सूट दिल्यास या प्राध्यापकांना नेट-सेटच्या सक्तीतून सूट देता येईल, असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने फेब्रुवारी २०१२ मध्ये राज्य शासनास कळविला. पण नियुक्तीच्या तारखेपासून सेवा कायम करून आर्थिक लाभ देण्याच्या मागणीवर प्राध्यापक ठाम राहिल्याने तिढा निर्माण झाला होता. राज्य शासनाने विधी व न्याय विभागाचे मत मागविल्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शासननिर्णय (जीआर) लागू होईल, तेव्हापासूनच लाभ देता येईल, असे स्पष्ट केले. मंत्रिमंडळानेही तीच भूमिका घेतल्याने आता नियुक्तीच्या तारखेपासून या प्राध्यापकांना सेवेत कायम न करता शासननिर्णयाच्या तारखेपासून सेवेत कायम केले जाईल. त्यांना ‘करियर अॅडव्हान्स स्कीम’ अंतर्गत पुढील सहा वर्षांनंतर आर्थिक लाभ सुरू होतील. कर्मचारी हिस्सा निवृत्तीवेतन योजना (काँट्रिब्यूटरी) लागू होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.
प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
सेट-नेटग्रस्तांना ‘गारवा’
राज्यातील नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांना पुढील आठवडय़ात शासन निर्णय लागू होईल, त्या दिवसापासून सेवेत सर्व अटी शर्तीसह कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्याचा लाभ २३०७ प्राध्यापकांना होणार असून त्यांना आता नेट-सेट परीक्षा द्यावी लागणार नाही. नियुक्तीच्या तारखेपासून सेवेत कायम करून सर्व आर्थिक लाभ देण्याची प्राध्यापकांच्या संघटनेची मागणी राज्य शासनाने फेटाळली आहे.

First published on: 07-03-2013 at 05:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netset relief likely to benefit 2307 teachers