मुंबई : मुंबई महापालिकेने १६ वर्षे जुने जाहिरात फलक धोरण बदलून नवीन धोरण तयार केले आहे. नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर १५ दिवसांमध्ये हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. २६ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. या नव्या धोरणात डिजिटल जाहिरात फलकांबाबतच्या नियमावलीचाही समावेश करण्यात आला आहे. दुभाजक, पदपथ, इमारतीच्या गच्चीवर, संरक्षक भिंत, रस्त्यावरील कमानी, यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. हा मसुदा मंजूर झाल्यानंतर नवीन धोरण १० वर्षांसाठी लागू करण्यात येणार आहे. हेही वाचा - पिंपरी-चिंचवड: पोलीस शिपाईच्या रिक्त पदासाठी आज लेखी परीक्षा; पोलिसांचे उत्तम नियोजन, राहण्याची आणि नाष्ट्याची केली सोय घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरात फलक धोरणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. मुंबई महानगरपालिकेने २००८ मध्ये आखलेले जाहिरात फलक धोरण १० वर्षांनी अद्यायावत करणे आवश्यक असताना अद्याप नवीन धोरण आखले नसल्याची बाब उघडकीस आली होती. घाटकोपरची दुर्घटना झाल्यानंतर पालिका प्रशासनाने सक्षम जाहिरात फलक धोरण तयार करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. त्यामध्ये सह पोलीस आयुक्त (वाहतूक), महानगरपालिकेचे उप आयुक्त (विशेष), अनुज्ञापन अधीक्षक, पर्यावरणविषयक नामांकित तज्ज्ञ संस्थेचे एक प्रतिनिधी, आयआयटी मुंबईचे दोन तज्ज्ञ सदस्य, आयआयटी मुंबईच्या औद्याोगिक संरेखन विभागाचे एक तज्ज्ञ प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीच्या सूचना अंतर्भूत करून सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्यात आले आहे. हेही वाचा - पुणे : वणव्यानंतर पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतीचा तळेगाव दाभाडेनजीक शोध इथे पाठवा हरकती व सूचना नव्या जाहिरात फलक धोरणाबाबत संबंधितांनी आपल्या लेखी हरकती व सूचना पालिका मुख्यालयात तळमजल्यावरील उपायुक्त विशेष यांच्या कार्यालयात किंवा दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्गावरील सिवेज ऑपरेशन इमारतीतील परवाना अधीक्षकांच्या कार्यालयात सादर कराव्यात, असे पालिका प्रशासनाने कळवले आहे. तसेच sl.licence@mcgm. gov. in किंवा hc01.licence@mcgm. gov.in या ई-मेल पत्त्यावर त्या पाठवाव्यात. नवीन धोरणात काय? इमारतीच्या गच्चीवर जाहिरात फलक नाही जाहिरात फलकाची लाबी, रुंदी जास्तीत जास्त ४० फूट काचेच्या तावदानावर ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाग व्यापला जाऊ नये रस्त्यांवरील कमानी, रस्ते दुभाजक, पदपथ, वाहतूक बेट, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली जाहिराती लावता येणार नाही. डिजिटल जाहिरातींची प्रकाशमानता कमी असावी. डिजिटल जाहिराती रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत बंद ठेवाव्यात.