२८ एप्रिल रोजी प्रवेशद्वाराजवळ आंदोलन
महिलांनाही हाजी अली दग्र्यातील मजारमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राज्यातील अनेक संस्थांनी एकत्र येऊन ‘हाजी अली सर्वासाठी’ या नावाच्या मंचाची स्थापना केली असून महिला प्रवेशासाठी मंचाच्या वतीने २८ एप्रिल रोजी शांतीच्या मार्गाने दर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनांनी उभारलेल्या या मंचामध्ये भूमात ब्रिगेड संघटना, रणरागिणी संघटना, उर्दू अभ्यासक, चित्रपट अभ्यासक, वकील, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ यांचा पाठिंबा मिळाला आहे.
राज्यघटनेने महिलांना समानतेचा हक्क दिलेला असताना आजही धर्माच्या नावाखाली महिलांच्या स्वातंत्र्यावर र्निबध आणले जात असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. २० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चे प्रकाश रेड्डी, दिग्दर्शक सईद मिर्झा, मुस्लिम अभ्यासक झीनत शॉकत अली, लेखक जावेद सिद्दिकी, ‘वाघिणी’च्या ज्योती बडेकर, ‘सद्भावना संघा’च्या वर्षां विद्या विलास आदी मान्यवर उपस्थित होते.
मुस्लिम महिलांना मक्का, मदिना, नजफ आदी धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेश आहे, मात्र हाजी अलीच्या दग्र्यामध्ये महिलांना विरोध केला जात आहे. २००१ मध्ये हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश दिला जात होता, मात्र दग्र्याचे विश्वस्त बदलल्यानंतर महिलांना प्रवेश नाकारला गेला. हा लोकशाहीचा आणि महिलांच्या हक्काचा लढा असल्याचे लेखक हसन कमाल यांनी अधोरेखित केले. हाजी अली दग्र्याच्या प्रवेशासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे ‘भूमात ब्रिगेड संघटने’च्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.