लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल होणार असून या बस स्वतःच्या मतदारसंघात याव्यात यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली आहे. महामंडळाकडे बसच्य मागणीबाबत पत्रांचा वर्षाव होऊ लागला आहे. परंतु, नवीन बस राज्यातील प्रत्येक आगारात दाखल होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे नवीन बस प्रत्येक एसटी आगारात पोहचल्या पाहिजेत, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला केली आहे.
गेली अनेक वर्षे महामंडळाच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच ताफ्यातील उपलब्ध बसची स्थिती दयनीय असून खिळखिळीत झालेल्या नादुरुस्त बस राज्यातील रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी लोकप्रतिनिधींकडे नव्या बससाठी तगादा लावला आहे. तालुक्याला व गावाला नवीन बस मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली आहे. नवीन बसची मागणी करणारी अनेक पत्रे महामंडळाला पाठवण्यात आली आहेत. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या २,६४० बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. परंतु या बस राज्यातील सर्व आगारांना उपलब्ध होणे गरजेचे आहे.
यंदा २ हजार ६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. आतापर्यंत एसटीच्या एकूण २५१ आगारांपैकी ११३ आगारात नवीन लालपरी बस पोहोचल्या आहेत. या आगारात ८८२ बस दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झाल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व २५१ आगारांना नवीन बस मिळतील असे नियोजन करावे. महामंडळाच्या नवीन बस प्रवाशांनी चांगले स्वागत केले आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. सर्व बसमध्ये जीपीएससह सीसी टीव्ही कॅमेराही बसवण्यात यावेत, अशा सूचनाही सरनाईक यांनी केल्या आहेत.
महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृहे उभारणार
एसटीला डिझेल पुरवठा करण्याऱ्या संस्थांकडून सीएसआर निधीच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाच्या बस स्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी केल्या.
भाडेतत्त्वावरील विद्युत बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करा
महामंडळाने भाडेतत्वावर ५,१५० विद्युत बसच्या पुरवठ्यासाठी संबंधित संस्थेबरोबर करार केला आहे. मात्र या संस्थेने केवळ २२० बसगाड्या पुरवल्या आहेत. करारानुसार भाडेतत्वावरील बसगाड्या न पुरविणाऱ्या संबंधित संस्थेला अंतिम मोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्याबरोबर केलेला करार रद्द करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.