scorecardresearch

एसटीच्या ताफ्यात चार हजार नवीन बस; एसटी महामंडळाच्या संचालक बैठकीत मंजुरी; विजेवर धावणाऱ्या दोन हजार बसचा समावेश

एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षअखेरीस तब्बल चार हजार बसगाडय़ांची भर पडणार आहे.

st bus
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षअखेरीस तब्बल चार हजार बसगाडय़ांची भर पडणार आहे. एसटी महामंडळाच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चार हजार बस घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विजेवर धावणाऱ्या दोन हजार बसचा त्यात समावेश आहे. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाडय़ा होत्या. गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाडय़ा खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र आयुर्मान संपुष्टात आलेल्या बसगाडय़ा भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाडय़ांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने आपल्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चार हजार बसगाडय़ा घेण्याच्या प्रस्तावाला  महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. यामध्ये विजेवर धावणाऱ्या बसचाही आहे. प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधन खर्च कमी करण्यासाठी महामंडळ विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ा घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या‘फेम’ योजनेअंतर्गत टप्याटप्याने १५० बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी ५० बस मिळणार आहे. यापैकी दोन बस सध्या पुणे ते अहमदनगर ते पुणे मार्गावर धावत आहेत. संचालक मंडळाने दिलेल्या मंजुरीमध्ये चार हजार बसपैकी आणखी दोन हजार विजेवर धावणाऱ्या बस असून काही वातानुकूलित तर काही विनावातानुकूलित बस आहेत.

दोन हजार सीएनजी बस खरेदी 

इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यातील डिझेलवरील एक हजार बस सीएनजीत परावर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी दोन हजार सीएनजी बस खरेदी करणार आहेत. त्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली.

चार हजार बस घेण्यासंदर्भात एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. यात दोन हजार विजेवर धावणाऱ्या बस असून त्या भाडेतत्त्वावर असतील. तर उर्वरित बस  सीएनजीवरील असून त्या खरेदी करण्यात येणार आहेत. 

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New buses st meeting directors st corporation including electric buses ysh

ताज्या बातम्या