मुंबई : चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पण आता मात्र मे महिन्यात ही मार्गिका पुन्हा सेवेत दाखल होणार आहे. मोनोरेल रुळावर येणार असून मुंबईकरांना पुन्हा मोनोरेलने प्रवास करता येणार आहे. पावसाळ्याआधी मोनोरेल सेवेत दाखल करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाला वेग दिला आहे. दुसरीकडे मोनोरेलची प्रवासी संख्या वाढावी यासाठी मोनोरेलला मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द) मार्गिेकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेट्रो-मोनोरेलची जोडणी करून एकाच वेळी मोनोरेल आणि चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल केले जाणार आहे.

मुंबईतीलच नाही तर देशातील एकमेव अशी मोनोरेल मार्गिका म्हणजे चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिका ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या वादात अडकली आहे. या मार्गिकेला प्रवासीच मिळत नसल्याने मार्गिका तोट्यात आहे. दुसरीकडे गाड्यांची कमी संख्या, गाड्यांची दुरवस्था आणि सातत्याने होणारे अपघात, दुर्घटना यामुळे मोनोरेल प्रकल्पावर टीका होत आहे. अशात १९ ऑगस्ट २०२५ मध्ये मोनोरेल बंद पडली.

मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्याची वेळ आली. त्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच असल्याने अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये एमएमआरडीएने मोनोरेल मार्गिकेवरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली. सेवा काही काळासाठी बंद करत मोनोरेल सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी केली. नवीन अत्याधुनिक मोनोरेल प्रणाली आणि अत्याधुनिक गाड्या सेवेत दाखल करून मोनोरेलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील काही दिवसांपासून गाड्यांचे अत्याधुनिकीकरण सुरू असून गाड्यांच्या चाचण्याही सुरू आहेत. तर मोनोरेलची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यासाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा (सीएमआरएस) स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एमएमआरडीएने आता हा प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी मोनोरेल सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने कामाला वेग दिला आहे.

मोनोरेल मार्गिका सेवेत दाखल करतानाच प्रवाशांचा प्रतिसाद कसा वाढेल याचा विचार एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मोनोरेलला चेंबूर येथे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दुजोरा दिला. मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा येत्या काही दिवसात सेवेत दाखल होणार आहे. डायमंड गार्डन – सारस्वत नगर हा मेट्रो २ ब चा दुसरा टप्पा २०२७ मध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. याच टप्प्यात चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश आहे. मात्र मोनोरेलचा प्रतिसाद वाढावा यासाठी या टप्प्यातील एकमेव चेंबूर मेट्रो स्थानक एप्रिलपर्यंत पूर्ण करून ते मेमध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार चेंबूर मेट्रो स्थानकाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

चेंबूर मोनोरेल स्थानक आणि चेंबूर मेट्रो रेल स्थानकामध्ये काही किमीचे अंतर आहे. ही दोन्ही स्थानके थेट कशी जोडता येतील यावर विचार सुरू आहे. मोनोरेल आणि मेट्रोचा वापर प्रवाशांना करता यावा, मेट्रोचे प्रवासी मोनोरेलकडे वळावेत, मेट्रोतून उतरून त्यांनी पुढे मोनोरेलने प्रवास करावा यासाठी एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच प्राधान्यक्रमाने मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक पूर्ण करून सेवेत दाखल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मेमध्ये चेंबूर मेट्रो स्थानक आणि मोनोरेल मार्गिकेची सेवा सुरू होणार आहे हे आता जवळपास निश्चित झाले आहे. तेव्हा नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या मोनोरेलला आता तरी प्रवाशांची पसंती मिळते का, मोनोरेल तोट्यातून बाहेर येते का हे महत्त्वाचे आहे.