विशाखापट्टणम… अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली

मुंबई : शत्रूला चकवा देतानाच त्याच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांसाठी भेदक ठरणारी अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली हा भारतीय नौदलाचा आता नवा चेहरा असेल. अतिअद्ययावत संदेशवहन आणि युद्धप्रणालीने सज्ज असलेली विशाखापट्टणम ही प्रोजेक्ट१५ ब्राव्होमधील पहिलीच गायडेड मिसाइल विनाशिका त्यामुळे बहुपयोगी युद्धयंत्रणाच ठरली आहे.

संरक्षणमंत्री राजनार्थ र्व्हिसग यांच्या हस्ते येत्या रविवारी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे. आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत भारतीय नौदलाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून नौदलाने ७५ टक्क्यांहून अधिक स्वयंपूर्णता प्राप्त केली आहे. या नव्या अद्ययावत विनाशिकेची धुरा कॅप्टन बीरेंद्र बैन्स यांच्या हाती असेल. विनाशिकेबाबत ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना ते म्हणाले, या विनाशिकेच्या निर्मितीच्या निमित्ताने भारतीय नौदलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हनुमानउडीच घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे विनाशिकेच्या तळासाठी वापरलेले स्टील पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून ते वजनाला तुलनेने हलके आहे. त्यामुळे विनाशिकेचा आकार अधिक लांबीचा असूनही वजन काही अंशी कमी करण्यात यश आले आहे. वजन कमी असल्याने कमीतकमी इंधन वापर करून अधिक पल्ला गाठणे शक्य होणार आहे. ‘विशाखापट्टणम’ ही आजवरची सर्वाधिक लांबीची अशी विनाशिका आहे.

एरव्ही पाणबुड्यांवर मारा करण्यासाठी वापरले जाणारे पाणतीर युद्धनौकांच्या दोन्ही बाजूंना असायचे, मात्र या विनाशिकेच्या मध्यवर्ती भागात त्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. या विनाशिकेवरील शस्त्रसामग्रीही आजवरची सर्वांत अद्ययावत अशी आहे. भूपृष्ठावर स्वनातित वेगात मारा करणारी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे यावर तैनात आहेत. या विनाशिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अतिवेगवान संदेशवहन प्रणाली आणि युद्धप्रणाली. परिसर वेगात स्कॅन करणारे सरफेस सर्व्हिलन्स रडार असलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. त्यामुळे आजूबाजूचा काहीशे किलोमीटर्सचा परिसर विनाशिकेच्या टापूत आला आहे. नव्या अतिअद्ययावत युद्धप्रणालीमुळे पूर्वी संदेशवहनानंतर शस्त्रास्त्रांचा मारा करण्यास लागणारा वेळ आता कमी झाला आहे. युद्धसदृश परिस्थितीत आदेश देणाऱ्या नेतृत्वाला वेगात काम करावे लागते. असे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या युद्धनौकांमध्ये ही विनाशिका सर्वात अग्रणी असेल, असेही बैन्स म्हणाले.

विशाखापट्टणममवरील अतिअद्ययावत संदेशवहन प्रणाली आधुनिक युगाला साजेशी दुहेरी आहे. यामध्ये शत्रूच्या यंत्रणेला ब्लॉक करण्याची त्याचप्रमाणे त्याची दिशाभूल करण्याचीही क्षमता आहे. त्याचप्रमाणे आक्रमक वापरासाठी त्यांच्या संदेशवहनाचा माग काढण्याचीही क्षमता यामध्ये आहे. या दुहेरी वापरामुळे शत्रूला मात देणे सहज शक्य होऊ शकते. याशिवाय यावर बराक ही हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा असून शक्ती ही नव्याने विकसित केलेली इलेक्ट्रॉनिक टेहळणी यंत्रणाही कार्यरत आहे. एकूणच या नव्या अतिअद्ययावत यंत्रणांमुळे या विनाशिकेचा वापर बहुपयोगी युद्धयंत्रणा म्हणून सहज करता येऊ शकेल, असा विश्वासही बैन्स यांनी व्यक्त केला.

विनाशिकेची वैशिष्ट्ये

’ ‘विशाखापट्टणम’ ही आजवरची सर्वाधिक लांबीची विनाशिका

’ वजन कमी असल्याने कमीतकमी इंधन वापर करून अधिक पल्ला गाठणे शक्य

’ विनाशिकेवरील शस्त्रसामग्रीही आजवरची सर्वांत अद्ययावत

’ अतिवेगवान संदेशवहन प्रणाली आणि युद्धप्रणाली

’ वेगात स्कॅन करणारे सरफेस सर्व्हिलन्स रडार असलेली पहिलीच युद्धनौका