ऑगस्टमध्ये नव्या घरांची उत्तम विक्री!

दसरा-दिवाळीबाबत विकासक आशावादी

दसरा-दिवाळीबाबत विकासक आशावादी

मुंबई : करोनाकाळातील दुसऱ्या लाटेचा फटका सहन कराव्या लागलेल्या विकासकांसाठी ऑगस्ट महिना सकारात्मक ठरला असून शासनाकडून कुठलीही सवलत जाहीर झालेली नसतानाही यंदाच्या वर्षांत पहिल्यांदाच नव्या घरांची चांगली विक्री झाली. त्यामुळे शासनाने आणखी काही सवलती दिल्या तर दसरा-दिवाळीत घरविक्रीला वेग येईल, असा त्यांचा दावा आहे.

करोना साथीनंतर गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत घरांची विक्रमी विक्री झाली होती. मात्र त्यास राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत कारणीभूत होती. तशीच सवलत पुन्हा मिळावी, अशी विकासकांची मागणी आहे. मात्र मुद्रांक सवलत देण्यास राज्य शासनाने असमर्थता दर्शविली आहे. अशात ऑगस्ट महिन्यात मुंबईत घरविक्री व्यवहाराच्या ज्या सहा हजार ७८४ नोंदी झाल्या, त्यापैकी सहा हजार २४१ नोंदी या नव्या घराच्या विक्रीच्या आहेत. चालू आर्थिक वर्षांत असे पहिल्यांदाच घडल्याचे विकासकांचे म्हणणे आहे.

एप्रिलमध्ये एकूण दहा हजार १३६ नोंदणीपैकी नव्या घराच्या नोंदणीचे व्यवहार फक्त ७१० इतकेच होते. मेमध्ये पाच हजार ३६० पैकी १५५४, तर जून व जुलैमध्ये अनुक्रमे सात हजार ८५७ व नऊ हजार ८२३ पैकी ३३०० व ५२४४ व्यवहार हे नव्या घरविक्रीचे होते.

मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही लोकांकडून नव्या घरांना मागणी येत आहे, ही विकासकांच्या दृष्टीने समाधानाची बाब असल्याचे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले. आतापर्यंत २०१२ पासून ऑगस्ट महिन्यात फक्त २०१८ मध्ये सहा हजार घरांची विक्री झाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

करोनाकाळातील एप्रिल २०२० पासून घरविक्रीचा आढावा घेतला तर सप्टेंबरपासून घरविक्री वाढली. डिसेंबरमध्ये सर्वाधिक म्हणजे १९ हजार ५८१ घरविक्री झाली. त्यानंतर जानेवारी ते मार्च-एप्रिलमध्ये घरविक्री व्यवहाराची संख्या वाढलेली दिसत असली तरी मुद्रांक शुल्कातील तीन टक्के सवलत व नोंदणीसाठी दिलेला चार महिन्यांचा कालावधी त्यास कारणीभूत आहे. मार्चमध्ये १७ हजार ४४९ व्यवहारांची नोंद आढळते; परंतु नव्या घरांची विक्री हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच होती.

त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात झालेली वाढ लक्षणीय व विकासकांचा आनंद द्विगुणित करणारी आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर शासनाने मुद्रांक सवलत दिली तर पुन्हा घरविक्रीच्या विक्रमी व्यवहाराची नोंद होऊ शकते, असेही बैजल यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New homes sales surge in august zws