मुंबई : न्यू इंडिया को.-ऑप बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहारातील सुमारे ३० कोटी रुपये स्वीकारणाऱ्या उन्ननाथन अरूणाचलम ऊर्फ अरूण भाई (६२) याला आर्थिक गुन्हे शआखने अटक केली. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अरूण भाई पळून गेला होता. आता याप्रकरणातील अटक आरोपींची संख्या ६ वर पोहोचली आहे.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याने इतर आरोपींसोबत कट रचून प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यातील १५ कोटी रुपये अटक आरोपी अरूणाचलम याने मुलाच्या उपस्थित मेहताकडून स्वीकारले होते. हा व्यवहार २०१९ मध्ये झाला होता. सौरऊर्जा यंत्रणा पुरवणारे व्यवसायिक उन्ननाथन अरूणाचलम ऊर्फ अरूण भाई याला सुमारे ३० कोटी रुपये दिल्याचे चौकशीत हितेशने सांगितले होते. पण याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अरूण भाई व त्याचा मुलगा मनोहर दोघेही पळाले होते. आरोपी मनोहरने अरूण भाईला पळण्यास मदत केली होती. याशिवाय त्याला लपवण्यासाठी विविध व्यक्तींशी संपर्क साधल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. अखेर त्याल अटक करण्यात आली. अरूण भाईने दोन संस्थांमध्ये रक्कम गुंतवण्याचे आश्वासन दिल्याचे मेहताने चौकशीत सांगितले होते. याप्रकरणी अरूणभाईविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने लुक आऊट सर्कुलर जारी केले होते. गेल्या एक महिन्यांपासून अरूणाचलम पोलिसांचा समेमिरा चुकवत होता. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात पोलिसांना यश आले. अरूणचलमला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली. अपहाराच्या रक्कमेतील ७० कोटी रुपये मेहताने पौनला दिल्याचा संशय आहे. गैरव्यवहार सुरू असतानाही त्याच्याकडे काणाडोळा करणारे बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोअन यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर मनोहर अरुणाचलम, कपिल देढिया व अरूणाचलम उन्ननाथ यांना अटक करण्यात आली आहे.