मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासन न्यू माहीम शाळेची इमारत पाडण्याच्या निर्णयावर ठाम असून संबंधित शाळा सुस्थितीत असल्याचा दावा करणारे पालक व सामजिक कार्यकर्ते शाळेसाठी अद्यापही लढा देत आहेत. इमारतीची दुरुस्ती करून शाळा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाने (आप) मुंबई रक्षण समितीच्या माध्यमातून शिक्षणमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले आहे.
न्यू माहीम शाळेच्या संरचनात्मक लेखापरीक्षणात संबंधित शाळेची इमारत अतिधोकादायक असल्याचे नमूद करून लवकरच शाळेचे पाडकाम करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, संबंधित शाळा धोकादायक नसल्याचा दावा पालक, सामाजिक कार्यकर्ते व अन्य स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. पालिकेच्या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्र व स्थानिकांनी यापूर्वी आंदोलने केली आहेत. वारंवार महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊनही त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. महिनाभरापूर्वी शाळेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले होते. मराठी अभ्यास केंद्राने महापालिका मुख्यालयासमोर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली होती. तसेच, पालिका आयुक्तांसोबत शाळेच्या मुद्द्यावर चर्चा देखील केली होती. मात्र, आयुक्तांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. निवडणूक व आचारसंहितेमुळे मराठी अभ्यास केंद्र, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या. त्यांनतर शाळेचा मुद्दा काही काळ थंडावला. मात्र, आता पुन्हा शाळेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
‘आप’च्या प्रणाली राऊत यांनी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री भुसे यांना पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी शशांक मेहंदळे यांच्या संरचनात्मक तपासणीच्या अहवालाचा दाखला देत शाळा मोडकळीस आली नसल्याचे नमूद केले आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या अनेक शाळा चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आल्याचा दावा केला आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी तोडलेल्या मोरी रोड शाळेचे अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही. माहीमधील कापडबाजार येथील भूखंड शाळा व क्रीडांगणासाठी राखीव असताना तेथे टोलेजंग इमारती बांधण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इमारतीच्या केवळ ११ खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या जमिनीचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच केला जाणार आहे. तसेच, या शालेय इमारतीचे बांधकामही महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही पालिकेच्या भूमिकेबाबत शिक्षण कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांकडून शंका व्यक्त केली जात आहे. न्यू माहीम शाळेचीही अन्य शाळांप्रमाणेच अवस्था होण्याची भीती आहे. त्यामुळे त्या शाळेचा सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन शाळा वाचवावी. शालेय इमारतीची दुरुस्ती करून शाळा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी राऊत यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, या जमिनीचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच केला जाणार आहे. तसेच, या शालेय इमारतीचे बांधकामही महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने पूर्वीच स्पष्ट केले.

