मुंबई: मंत्रालयाशेजारीच नवीन मंत्रालयाची इमारत उभी राहत असून या इमारतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला पहिल्या मजल्यावर सात हजार चौरस फुटांची जागा मिळणार आहे. मंत्रालयाच्या सहा मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे ९ हजार चौरस फुटांचे कार्यालय असून त्या जोडीला हे नवीन कार्यालय मुख्यमंत्र्यांना उपलब्ध होणार आहे. मंत्रालयाच्या या नवीन इमारतीची बांधकामपूर्तीची तारीख तिसऱ्यांदा हुकली असून आता जुलै अखेरीस ही इमारत पूर्ण होणार असली तरी पाचही मजल्यांवरील कार्यालयांचे वाटप मात्र आताच करण्यात आले आहे.

मंत्रालयातील जागेच्या अडचणीमुळे मंत्री कार्यालयांना सोयीची जागा उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारने गार्डन गेट जवळ नवीन पाच मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. मंत्रालय मुख्य इमारतीला लागून उभ्या राहत असलेल्या या इमारतीचे बांधकाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १०० दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. संपूर्ण पोलादी ढाच्यावर उभ्या असलेल्या या इमारतीचे बांधकाम तेवढ्या वेळात पूर्ण होणे शक्य झाले नाही. त्यानंतर या बांधकामपूर्ततेसाठी १ मे २०२६ ची तारीख ठरवण्यात आली, मात्र इमारत उभी राहत असली तरी त्यात बरेच काम असल्याने तेवढ्यात हे काम पूर्ण होणे शक्य नसल्याने आता नवीन तारखेनुसार ३१ जुलैपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

नवीन मंत्रालयात मंत्र्यांना प्रशस्त दालन

या नवीन मंत्रालयाला विस्तार २ हे नाव देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार दोन कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री अशा सात मंत्र्यांना नव्या इमारतीत प्रशस्त दालन मिळले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला सात हजार चौरस फूट आकाराचा संपूर्ण पहिला मजला मिळाला आहे.

नव्या इमारतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर या दोन कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, इंद्रनील नाईक, योगेश कदम, माधुरी मिसाळ आणि मेघना दीपक बोर्डीकर-साकोरे यांना जागा मिळाली आहे. कॅबिनेट मंत्र्यांना १६०० ते १७०० चौरस फूट तर राज्यमंत्र्यांना १४०० ते १५०० चौरस फूट आकाराची जागा देण्यात आली आहे. मंत्र्यांच्या व्यतिरिक्त मंत्रालयाबाहेर असलेल्या वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या इमारतीत जागा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुख्य मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाला ९ हजार चौरस फुटाची जागा असताना नव्या इमारतीचा पहिला मजला मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ( ४ हजार ९२६ चौ. फू.), विकसित महाराष्ट्र (६६६ चौ. फू. )सेजीस टीम, सल्लागार आणि सीएम डॅशबोर्डसाठी (७७१ चौ. फू.) विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी (२८१ चौ. फू.) आणि योजना सामान्य कक्षासाठी (३३० चौ. फू.) जागा मिळाली आहे. नव्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील बैठक कक्ष उभारण्यात येणार आहे.

दिव्यांग विभागाला मंत्रालयात जागा

दरम्यान, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांची दालने नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर सध्या बाहेर असलेल्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ग्रामविकास, दिव्यांग कल्याण मंत्रालय या विभागांना जुन्या मंत्रालयात जागा दिली जाणार आहे. दिव्यांग विभागासाठी मंत्रालयातील तळ मजल्याच्या जागेचा शोध सुरु आहे. सध्या दिव्यांग कल्याण विभाग भाड्याच्या जागेत असून भाड्यापोटी सरकारला वार्षिक १ कोटी रुपये द्यावे लागतात.

नवीन मंत्रालय इमारतीचे वैशिष्ट्य

  • प्री फॅब या आधुनिक तंत्राने पर्यावरणपूरक इमारत
  • मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी प्रशस्त बैठक कक्ष
  • तळ मजल्यावर नागरिकांसाठी चहापानाची सुविधा असलेले कॉफी हाऊस