मुंबई-ठाणेकरांसाठी भाजपचे निवडणूक पॅकेज; १५ हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांना मान्यता

मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला कामाला जुंपले आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये सत्ताधारी शिवसेना सर्वच कामांचे श्रेय घेत असल्याने त्यावर उतारा म्हणून भाजपने आता एमएमआरडीएच्या माध्यमातून दोन्ही शहरांमधील मतदारांवर विकास कामांची मोहिनी टाकायला सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वीच काही मेट्रो प्रकल्पांची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणखी दोन मेट्रो प्रकल्पांना मान्यता दिली. अशाचप्रकारे आणखी काही प्रकल्पांच्या माध्यमातून मतदारांना स्वप्ने दाखवायला भाजपने सुरुवात केल्याचे बोलेले जात आहे.

मुंबई-ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांच्या हद्दीत एमएमआरडीएने योजनांच्या घोषणांचा सपाटा लावला आहे. सुमारे १४ हजार ५४६ कोटी रुपये खर्चाच्या वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो प्रकल्पास मान्यता देताना सगळ्या प्रकल्पांसाठी लागणारा निधी कसा उभा करणार, सध्या पैसे आहेत म्हणून दररोज नवनव्या प्रकल्पांची घोषणा केली जात असली तरी हे प्रकल्प पुढे कसे चालणार, त्यासाठी निधीची काय व्यवस्था असे अनेक प्रश्न वित्त विभागाने उपस्थित केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यात आली. (पान १३ वर) (पान १ वरून) त्याचप्रमाणे डीएननगर- मानखुर्द या १० हजार ९८६ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासही मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर ठाणे मेट्रोच्या विस्ताराची मागणी होताच ती कल्याणपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तशीच अंधेरी- दहिसर मेट्रोचा भाईंदपर्यंत विस्तार करण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी ‘जो जे वांच्छील तो ते देण्याची’ भूमिका घेऊन मतांसाठी स्वप्ने दाखवायला सुरुवात केल्याची चर्चा आता मंत्रालयात ऐकावयास मिळत आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी मंजुरी आणि भूमिपूजन झालेल्या मेट्रो प्रकल्पांची कामे अजूनही सुरू झालेली नसतानाच १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणखी दोन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. तर नजिकच्या काळात दहिसर- भाईंदर आणि शिवडी- प्रभादेवी याही मार्गाना मंजुरी देण्याची तयारी एमएमआरडीत युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते. प्राधिकरणाच्या  बैठकीत मुंबईत शहरामध्ये ५०० वाय-फाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी १९४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला.

यांना मंजुरी..

  • ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ आणि स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६ या मार्गाच्या प्रकल्प अहवालास.
  • ठाण्यात कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या रुंदीकरणासाठी २५९ कोटी रु.