उणे १४ अंश से. तापमानाखाली शव जतन करण्याची सुविधा, अवयवदानासाठी फायदेशीर

मुंबई : अवयवदानासाठी प्राप्त झालेल्या शरीरामधून प्रत्यारोपणासाठीचे अवयव शास्त्रीयरीत्या विलग करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी केईएम रुग्णालयात कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेचा भाग म्हणून प्रशिक्षणासाठी प्राप्त झालेल्या शवांचे उणे १४ अंश से. तापमानाखाली जतन करण्याकरिता रुग्णालयात नवीन शवशीतगृह सुरू झाले आहे.

अवयवदानासाठी प्राप्त झालेल्या शरीरामधून प्रत्यारोपणासाठीचे अवयव शास्त्रीय पद्धतीने विलग करणे गरजेचे असते. यासाठी डॉक्टरांना प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देणे आवश्यक असते. प्रात्यक्षिकांसाठी शवाचा वापर केला जातो. हे शव चांगल्या स्थितीत जतन केल्यास त्यावर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया शिकविता येते. परंतु अशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कार्यशाळांमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात अडचणी येतात. अधिकाधिक डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन अवयव दानाच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य आणि विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीच्या (रोटो-सोटो) माध्यमातून केईएममध्ये अवयवदान कौशल्य प्रयोगशाळा उभारली जात आहे.

या प्रयोगशाळेचा पहिला टप्पा गेल्या आठवडय़ात सुरू झाला आहे. प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक शवांचे उणे १४ अंश से. खाली जतन करणारे नवे शवशीतगृह केईएममध्ये सुरू झाले आहे. न्यायवैद्यक शास्त्र विभागाअंतर्गत सुरू केलेल्या शीतगृहाचे उद्घाटन नुकतेच झाले आहे.

 सर्वसाधारणपणे रुग्णालयाच्या शव विभागातील शीतगृहामध्ये सुमारे पाच अंश से. तापमान असते. तर शरीरशास्त्र विभागातील चिकित्सेसाठी उपलब्ध असलेले शव हे फार्मालिनचा वापर करून जतन करण्यात येतात. त्यावर

 शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिके शिकविणे शक्य नसते. मृत शरीर ऋण १४ अंश से. तापमानाखाली जतन केल्यास असे शव शस्त्रक्रियेच्या प्रात्यक्षिकांसाठी योग्य असल्यामुळे हे नवे शीतगृह सुरू केले आहे. या शीतगृहामध्ये एका वेळी दोन शव ठेवण्याची सुविधा आहे, अशी माहिती रोटो-सोटोच्या न्यायवैद्यक शास्त्र समितीचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी दिली.

 केईएमध्ये रोटो-सोटोच्या मदतीने ही प्रयोगशाळा सुरू होत असून अवयवदान करण्यासाठीची शास्त्रीय कौशल्ये येथे शिकविली जातील. यामुळे प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेलाही वेग मिळेल, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत रोटो-सोटोच्या माध्यमातून मानवी शरीरातून यकृत, मूत्रिपड, हृदय इत्यादी अवयव कसे विलग करावेत याचे प्रशिक्षण शल्यचिकित्साकांसाठी आयोजित केले जाते. याच्या प्रात्यक्षिकांसाठी रुग्णालयात दान केलेल्या मृत शरीरांचा वापर केला जातो. हे शीतगृह उभारल्यामुळे आता या प्रयोगशाळेत कार्यशाळा घेण्यास मदत होईल. या प्रयोगशाळेचे काम पूर्ण होत आले असून लवकरच प्रयोगशाळा सुरू केली जाईल. – डॉ. सुजाता पटवर्धन, संचालक, मुंबई रोटो-सोटो