बदल्यांसाठीच्या मोबदल्याची प्रथा रोखणार!

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी मे-जून दरम्यान होणाऱ्या घाऊक बदल्यांमध्ये होणारी देवाण-घेवाण आणि वशिलेबाजी कायमची मोडीत काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार यापुढे या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने शिक्षकांसाठी लागू केलेला ऑनलाइन बदल्यांचाच कित्ता गिरवला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कायदा दुरुस्ती केली जाणार असून बदल्यांच्या या पारदर्शक धोरणाचा प्रस्ताव लवकच मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. येत्या मे महिन्यापासून या धोरणानुसार बदल्या होतील, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

राज्यात सुमारे सात लाख सरकारी अधिकारी -कर्मचारी असून दरवर्षी यातील काही टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. या बदल्या संबंधित विभागांच्या मंत्र्यामार्फत केल्या जातात. सार्वत्रिक बदल्यांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार, तसेच वशिलेबाजी यामुळे वजनदार अधिकारी नेहमीच  आपल्या मर्जीनुसार महत्त्वाची कार्यकारी पदे पटकावतात. मात्र ज्यांच्याकडे वशिला नाही  किंवा ज्यांना देवाण-घेवाण संस्कृती मान्य नाही असे अधिकारी- कर्मचारी मात्र कायम अकार्यकारी पदावर वा अडगळीच्या ठिकाणी फेकले जातात. बदल्यांचा हंगाम वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यातूनच वशिलेबाजीने बदल्या होत असल्याची चर्चा दरवर्षी कानावर येते. प्रशासनात रूजलेली ही भ्रष्ट संस्कृती नष्ट करण्याचा निर्धार आता मुख्यमंत्र्यांनी केला असून तसे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.

ऑनलाइन बदल्यांना शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान दिले होते, मात्र न्यायालयाने त्या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशाच बदल्या करण्याचा विचार सरकारच्या मनात रूजला आहे. या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेसाठी खास सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम  सध्या सुरू आहे.

प्रक्रिया कशी?

’ बदल्यांच्या नव्या धोरणानुसार बदलीस पात्र कर्मचारी आणि रिक्त जागांचा तपशील जानेवारी महिन्यात जाहीर होणार.

’ त्यानुसार कौटुंबिक अडचण अथवा पती वा पत्नीजवळ राहाता यावे, यासाठी ज्या कर्मचाऱ्यांना बदली हवी असेल त्यांना कोणत्या विभागात आणि कोणत्या ठिकाणी बदली हवी, याचा पसंतीक्रम द्यावा लागणार.

’ त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांनी पूर्वी कोणत्या पदांवर किती काळ सेवा बजावली आहे, याचा तपशील देणे बंधनकारक. त्यानुसार  सेवाज्येष्ठता आणि कार्यकारी- अकार्यकारी पदांवरील कामाचा अनुभव लक्षात घेऊन या बदल्या पसंतीक्रम विचारात घेऊन केल्या जाणार.