Premium

नवी मुंबईजवळ नवे नगर -‘एमएमआरडीए’ आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची घोषणा

‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात डॉ. संजय मुखर्जी यांनी मुंबई महानगर क्षेत्रात ‘एमएमआरडीए’मार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

new town near navi mumbai mmrda chief sanjay mukherjee announcement in loksatta shaharbhan event
एमएमआरडीए’ आयुक्त डॉ. संजय मुखर्जी

मुंबई : शिवडी येथून सुरू होणारा मुंबई-पारबंदर प्रकल्प (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) नवी मुंबईच्या दिशेला जेथे संपतो तेथे एक नवीन नगर विकसित करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात आयोजित ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात डॉ. संजय मुखर्जी यांनी मुंबई महानगर क्षेत्रात ‘एमएमआरडीए’मार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच भविष्यातील नियोजनाबाबतही प्राधिकरणाची भूमिका मांडली. मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचे अंतर अवघ्या २० ते २२ मिनिटांत पार करून देणारा शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असून, तो लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याचे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी होणार आहेच; पण हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाला एक नवी ओळख देणार आहे. नवी मुंबईतील ज्या भागातून हा सागरी सेतू जात आहे त्या भागात औद्योगिक, आर्थिक विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. हीच संधी लक्षात घेत मुंबई पारबंदर प्रकल्प प्रभाव क्षेत्रात म्हणजेच नवी मुंबईत सागरी सेतू जिथे संपतो त्या परिसरात एक नवीन नगर विकसित करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला असल्याचे डॉ मुखर्जी यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>> नायरमधे उभं राहतंय दहा मजली कर्करोग रुग्णालय!

दक्षिण मुंबईतून सागरी किनारा मार्गाने निघालेल्यांना थेट विरारमध्ये पोहचता यावे, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वर्सोवा ते विरार सागरी सेतू बांधण्यात येत आहे. ४५ किमीचा हा सागरी सेतू असणार असून, यातील जोडरस्त्यांचे काम धरून हा प्रकल्प ९४ किमीपर्यंत जात आहे. हा सागरी सेतू देशातील सर्वात लांब सागरी सेतू ठरणार आहे. ६५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जायकाच्या मदतीने निधी उभारणी करण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

 ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. ‘शहराचा विकास होत असताना आपल्या अनेक तक्रारी असतात. पण, काही घटक आपल्यासाठी काम करत असतात. दररोज पाणी येते,  रस्ते साफ होत असतात, बस धावत असते. तेव्हा हे शहर चालते कसे, याचा आणि आपला संबंध जोडला जावा, हीच या कार्यक्रमामागची भूमिका आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे नाव शहरभान आहे’, असे कुबेर म्हणाले. सारस्वत को-ऑप बँक लि. च्या शिल्पा मुळगांवकर आणि वीणा वल्र्डच्या केतकी काळे यांनी डॉ. मुखर्जी यांचे स्वागत केले. ‘लोकसत्ता’च्या मुंबई ब्युरो चीफ रसिका मुळय़े आणि मुंबई महानगर प्रदेश ब्युरो चीफ जयेश सामंत यांनी डॉ. मुखर्जी यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New town near navi mumbai mmrda chief sanjay mukherjee announcement in loksatta shaharbhan event zws

First published on: 07-12-2023 at 01:50 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा