‘एसी’ लोकलमधून प्रवासासाठी नवा पर्याय

वातानुकूलित लोकलमधून सामान्य प्रवाशांनाही प्रवास करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिकीटदरांतील फरकाचे पैसे भरून प्रवासास परवानगी

मुंबई : वातानुकूलित लोकलमधून सामान्य प्रवाशांनाही प्रवास करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांनी तिकीट तपासनीसाकडे भाडेदरातील फरकाची रक्कम जमा केल्यास त्यांना प्रवासास परवानगी देण्यात येईल. याबाबत सध्या चाचपणी करण्यात येत असून महिनाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०२१ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. या लोकलच्या दिवसाकाठी बारा फेऱ्या होतात. चर्चगेट ते बोरिवली, विरारदरम्यान धावणाऱ्या या गाडीतून करोनापूर्वकाळात दर दिवशी १८ ते २० हजार प्रवाशी प्रवास करीत होते. करोनाकाळात ही लोकल काही महिने बंद ठेवण्यात आली होती. वातानुकूलित सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर तिला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद मिळावा यासाठी पश्चिम रेल्वेने आता नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.

सामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांनाही वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी एक वेगळा प्रयोग करण्यात येणार आहे. फलाटावर सामान्य लोकलची प्रतीक्षा करणारे प्रवासी वातानुकूलित     एसी लोकलमधून प्रवासासाठी नवा पर्याय

लोकलमधूनही प्रवास करू शकणार आहेत. त्यासाठी सामान्य लोकलचे तिकीट व वातानुकूलित लोकलच्या भाडेदरातील फरक डब्यात उपस्थित तिकीट तपासनीसाकडे भरून प्रवासाची मुभा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवर याची चाचपणी सुरू असून महिन्याभरात ही सेवा प्रवाशांसाठी सुरू होईल. त्यामुळे प्रवासी संख्या, उत्पन्न वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा लवकरच

राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलीनुसार दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांच्यासाठी तिकीट व पास सुविधा तिकीट खिडक्यांवर उपलब्ध आहे. परंतु खिडक्यांसमोरील गर्दी कमी करण्यासाठी मोबाइल तिकीट सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये मोबाइल तिकीट अ‍ॅप युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासशी जोडून ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली जाईल. त्यामुळे दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांना तिकीट व पास मिळेल. ही सेवाही येत्या दोन आठवडय़ात सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे कंसल म्हणाले.

वातानुकूलित लोकलचे भाडे कमी होणार?

सध्या सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकलचे भाडे हे जास्तच असल्याने त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. नुकत्याच वातानुकूलित लोकलबाबत केलेल्या सर्वेक्षणातही भाडेदर कमी करण्याची सूचना ५२ टक्के  प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे अर्धवातानुकूलित लोकलचाही पर्याय पुढे आला. परंतु तांत्रिक दोष व रेल्वे मंडळानेही संपूर्ण वातानुकूलित लोकल चालवण्यातच सर दाखविल्याने अखेर प्रतिसादासाठी भाडेदर कमी करण्याचा पर्यायही पुढे येत आहे. रेल्वे मंडळानेही नुकतीच मेट्रो रेल्वेप्रमाणे भाडेदर आकारण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. भाडेदराबाबत रेल्वे मंडळाकडून विचारविनिमय सुरू असल्याची माहिती कंसल यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New travel ac local ysh

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या