मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून परतीचा प्रवास करणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांचा रात्रकालीन प्रवास वेगात होण्यासाठी, पश्चिम रेल्वेद्वारे आठ विशेष लोकल चालवण्यात येतील. समुद्र किनारी, पर्यटक स्थळी ३१ डिसेंबरच्या रात्री जल्लोष करणाऱ्या पर्यटकांना या विशेष लोकलमुळे मोठा दिलासा मिळेल.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री १.१५ वाजता चर्चगेटवरून पहिली विशेष लोकल सुटून रात्री २.५५ वाजता विरारला पोहोचेल. रात्री २ वाजता दुसरी लोकल चर्चगेटहून सुटून रात्री ३.४० वाजता विरारला पोहचेल. तिसरी लोकल रात्री २.३० वाजता चर्चगेटहून सुटून पहाटे ४.१० वाजता विरारला पोहोचेल. तर, चौथी लोकल पहाटे ३.२५ वाजता चर्चगेटहून सुटून विरारला पहाटे ५.०५ वाजता पोहचेल.
विरारहून पहिली विशेष लोकल रात्री १२.१५ वाजता सुटून चर्चगेटला रात्री १.५५ वाजता पोहोचेल. दुसरी विशेष लोकल रात्री १२.४५ वाजता विरारहून सुटून रात्री २.२५ वाजता चर्चगेटला पोहचेल. रात्री १.४० वाजता तिसरी विशेष लोकल विरारहून सुटून चर्चगेटला रात्री ३.२० वाजता पोहचेल. तर चौथी लोकल रात्री ३.०५ वाजता विरारहून सुटणार असून पहाटे ४.४५ वाजता चर्चगेटला पोहचेल. या आठही विशेष लोकल धिम्या मार्गावर धावून सर्व स्थानकावर थांबेल.
