मुंबई : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या आठवडय़ापासून दीड हजाराच्या पुढे गेली असून  शहरात सध्या तब्बल १३ हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत, तर शुक्रवारी एका दिवसात २ हजार २५५  नवीन रुग्णांची नोंद झाली, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आढळलेल्या २ हजार २५५ नवीन रुग्णांतील ९५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. ११० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १६ रुग्ण प्राणवायूच्या खाटांवर उपचार घेत आहेत, तर दिवसभरात १ हजार ९५४ रुग्ण करोनामुक्त झाले.  सध्या १३ हजार ३०४  रुग्ण उपचाराधीन आहेत.

रुग्णदुपटीचा कालावधी ३९९ दिवसांवर

 शहरात एकूण बाधितांची संख्या १० लाख ९० हजारावर गेली आहे. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण कमी होऊन पुन्हा  ९७ टक्के झाले आहे. तर रुग्णवाढीचा दर वाढून ०. १७० टक्के झाला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी आणखी घसरला असून ३९९ दिवसांवर आला. शुक्रवारी १४ हजार ६४३  चाचण्या करण्यात आल्या.  एकूण रुग्णशय्यांपैकी २.२९ टक्के खाटांवर रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्यात ९५७ करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ९५७ करोना रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या ९५७ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई ३६६, ठाणे ३२४, कल्याण – डोंबिवली ८७, मीरा-भाईंदर ७९, ठाणे ग्रामीण ५९, उल्हासनगर २७, बदलापूर दहा आणि भिवंडी पालिका क्षेत्रात पाच रुग्ण आढळून आले. तर मिरा-भाईंदर आणि उल्हासनगर पालिका क्षेत्रात प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ होण्याबरोबरच बाधीत रुग्णांचे मृत्यू होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. तर सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार २१५ आहे.