मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारितील महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी ‘एनएचएआय’ने १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेस एक वर्ष पूर्ण झाले असून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका वर्षात देशभरातील ८५ लाखांहून अधिक वाहनचालक – मालकांनी फास्टॅग वार्षिक पास खरेदी केले आहेत. या पासच्या माध्यमातून ७४ कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली आहे.
देशभरातील द्रुतगती महामार्गावरील पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, प्रवासी-वाहनचालकांचा वेळ वाचविण्यासाठी एनएचएआयने वार्षिक पास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधीची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारने यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग वार्षिक पास योजनेस सुरुवात झाली. एनएचएआयच्या संकेतस्थळावर आणि ॲपवर १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध झाला.
या वार्षिक पासच्या माध्यमातून पासधारकांना एनएचएआयच्या अखत्यारितील महामार्गांवरून ३,००० रुपयांत २०० फेऱ्या विनापथकर अर्थात पथकर न भरता प्रवास करण्यास सुरुवात झाली. पथकर भरण्याच्या कटकटीतून वाहनचालकांची सुटका झाली. दरम्यान, चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच हा पास लागू आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना ही योजना लागू नाही. राष्ट्रीय महामार्गांवरील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा फायद्याची ठरत आहे.
एनएचएआयकडून १ एप्रिल २०२६ पासून वार्षिक पास दरात २.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ३,००० रुपयांच्या फास्टॅग वार्षिक पाससाठी आता वाहनचालक-मालकांना ३,०७५ रुपये मोजावे लागत आहेत. दरवाढ झाली असली तरी या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आज या सुविधेला एक वर्ष पूर्ण होत असताना या सुविधेअंतर्गत फास्टॅग वार्षिक पासचे ८५ लाखांहून अधिक पासधारक असल्याची माहिती एनएचएआयने समाजमाध्यमांद्वारे दिली.
आतापर्यंत ७५ कोटींहून अधिक व्यवहार या वार्षिक पासद्वारे झाले असून इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात मोठी वाढ यामुळे झाल्याचेही एनएचएआयकडून सांगण्यात आले. या सुविधेमुळे पथकर नाक्यांवर होणाऱ्या वादांमध्ये ८९ टक्क्यांनी घट झाली आहे. ही सुविधा फायद्याची ठरत असल्याने वाहनचालक-मालक वार्षिक पासकडे वळत आहेत. एका वर्षात या सुविधेला चांगली पसंती मिळाल्याचे चित्र आहे.
