scorecardresearch

सलीम फ्रुट, खंडवानीसह सहा जणांची ‘एनआयए’कडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

एनआयएने खंडवानी यांची सोमवारी १० तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास खंडवानी हे काही कागदपत्रांसह एनआयए कार्यालयात हजर झाले होते.

मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहीम याच्या टोळीशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील २९ ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर दाऊदचा विश्वासू शकील शेख ऊर्फ छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट आणि बांधकाम व्यावसायिक सुहैल खंडवानी यांच्यासह सहा जणांची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चौकशी केली. एनआयएच्या पथकांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत या सहाजणांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांना काही कागदपत्रांसह मंगळवारी चौकशीला बोलवले होते. त्यानुसार ते मंगळवारी एनआयएसमोर हजर झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना पुन्हा बुधवारीही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

एनआयएने खंडवानी यांची सोमवारी १० तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास खंडवानी हे काही कागदपत्रांसह एनआयए कार्यालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांची चौकशी करण्यात आली. एनआयएच्या पथकांनी सोमवारी पहाटे अचानक दाऊद टोळीशी संबंधित, अमली पदार्थ तस्कर, हवाला ऑपरेटर, बांधकाम क्षेत्रातील हस्तक यांच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवली.

मुंबईतील २४ आणि मीरा भाईंदर परिसरातील पाच अशा एकूण २९ ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज, रोख रक्कम आणि पिस्तूल असा ऐवज ताब्यात घेतला होता. या दस्तऐवजांच्या आधारे दाऊद टोळीच्या दहशतवादासाठी पुरवण्यात येणारा निधी, अमली पदार्थ तस्करी, बनाव नोटा पुरवठय़ासह आर्थिक व्यवहारांचा तपास एनआयए करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nia also questioned six people next day daud ibrahim gang ysh