ओबेरॉय हॉटेलमधील खोली १०० दिवस आरक्षित!

अंबानींच्या घराजवळील स्फोटकांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात माहिती

Sachin Waze, antilia case
वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील खासगी वोकहार्ट रुग्णालयात दाखल होण्याची सचिन वाझे यांना परवानगी

अंबानींच्या घराजवळील स्फोटकांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात माहिती

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलातील एक खोली वेगवेगळ्या नावाने १०० दिवस आरक्षित केली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्रात दिली आहे. अंबानी यांच्याकडून मोठी खंडणी उकळण्याचा तसेच दहशतवादी कट उधळल्याचा आव आणण्याचा वाझे यांचा डाव असल्याचेही या आरोपपत्रात नमूद आहे.

‘चकमक’फेम अशी आपली पुन्हा ओळख निर्माण करण्यासाठी वाझे याने हा कट रचल्याचे आरोपपत्रात म्हटले असून त्याची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. सुशांत खामकर या नावे बनावट आधार कार्ड बनवून वाझे याने ओबेरॉय हॉटेलात १०० दिवसांसाठी खोली आरक्षित केली. या खोलीतूनच संपूर्ण कट रचला गेला. मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ या कामासाठी वापरल्याचे ठरल्यानंतर या गाडीचा नोंदणी क्रमांक वाझे यानेच बदलला. नीता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका रेंज रोव्हरचा नोंदणी क्रमांक त्यासाठी वापरण्यात आला. ही स्कॉर्पिओ डॉ. सॅम न्यूटन यांची असल्याची व या गाडीचे नूतनीकरण करण्यापोटी पैसे न दिल्याने ती हिरेन याच्या ताब्यात होती, याची कल्पना वाझेला होती. ती गाडी वाझे याने विकत घेतली होती, असेही या आरोपपत्रात नमूद आहे. हिरेन याच्याकडील ही गाडी या कटासाठी वापरण्याचे निश्चित झाल्यानंतर वाझे याने  ती आपल्या ठाण्यातील सोसायटीच्या आवारात काही दिवस ठेवली व नंतर त्याचा वापर केला, असेही त्यात नमूद आहे.

हा कट फसल्यानंतर तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. त्यावेळी या कटातील मनसुख हिरेन हा दुवा कच्चा असल्याचे वाझे याच्या लक्षात आले. त्यानंतर हिरेन याला संपविण्याचे ठरविण्यात आले. चकमकफेम निवृत्त सहायक आयुक्त प्रदीप शर्मा व गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांनी हिरेन हत्या कटाची अंमलबजावणी केली. यासाठी आवश्यक असणारी मोठी रक्कम वाझे याने पुरविली, असेही आरोपपत्रात नमूद आहे. हिरेन यांची हत्या कशी केली गेली, याचा आरेखनासह तपशील या आरोपपत्रात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nia chargesheet antilia bomb scare case sachin waze zws

ताज्या बातम्या