मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करायची होती, असं निरिक्षण एनआयए न्यायालयाने नोंदवलं आहे. मनसुख हिरेन हत्या आणि अँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणात सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हे मत नोंदवलं. याबाबत पीटीआयने वृत्त दिलं आहे.
विशेष एनआयए न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपी सचिन वाझेचा १६ सप्टेंबरला जामीन नाकारला. याप्रकरणी शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सविस्तर आदेश उपलब्ध झाला. यात या गोष्टींचा खुलासा झाला आहे. न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबाचा उल्लेख करत जामिनासाठी अर्ज केलेला आरोपी आणि त्याचा सहआरोपी यांनी अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण केली. तसेच षडयंत्र करून मनसुख हिरेन यांची हत्या केली.
“मनसुख हिरेनचा सुनियोजित खून करण्यात आला”
“तो सुनियोजित खून होता. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी सर्वोतपरी काळजी घेण्यात आली होती. हे भारतीय दंड संहितेनुसार केलेले साधे आरोप नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन दिल्यास साक्षिदारांना प्रभावित करण्याची शक्यता आहे,” असं मत न्यायालयाने व्यक्त केलं.
हेही वाचा : विश्लेषण: सचिन वाझे प्रकरणात तपास यंत्रणांचा वेगळा निर्णय का?
“आरोपीला अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करायची होती”
“जिलेटिन कांड्या डिटोनेटरला जोडलेल्या नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी, ती कृती लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. या प्रकरणात आरोपीला विशिष्ट लोकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती. हे विशिष्ट लोक अंबानी कुटुंब होतं,” असंही न्यायालयाने नमूद केलं.