मुंबई : मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) नुकताच प्राप्त झाला. याबाबतची माहिती मुंबई पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली आहे. या ई – मेलमध्ये अफगाणिस्थानचे नेते सिराजुद्दीन हक्कानीच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकन यंत्रणा ‘सीआयए’कडून संदेश आल्याचे भासवण्यात आले आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठवून धमकीबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ई-मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता.