मुंबई : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून मुंबईतील ट्रृॉम्बे चिता कॅम्प येथेही छापा टाकण्यात आला. यावेळी पीएफआयच्या कार्यालयातून अहमद अबिब्बुलाला नावाच्या व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे.अहमद हा मंगळूर येथून मुंबईत आला होता. तो तेथील पीएफआयच्या कार्यालयात राहत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनआयएने पहाटे छापा टाकून संशय़ीत अहमदला ताब्यात घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : पुण्यातील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयएचा छापा

इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) प्रमुख नेत्यांसह देशभरातील १०० हून अधिक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी छापेमारी सुरु केली. या कारवाईत तपास यंत्रणानी आतापर्यंत पीएफआयशी संबंधित १०६ जणांना ताब्यात घेतले आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक २२ जणांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रत्येकी २० जणांचा समावेश आहे. दरम्यान, एनआयएकडून राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे.