लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील चर्चगेट – मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान वानखडे पादचारी पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी रात्रकालीन तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट – मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान वानखडे पादचारी पुलाच्या मुख्य तुळईच्या कामासाठी शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तीन तासांच्या ब्लॉकमुळे काही लोकलवर परिणाम होईल. शनिवारी रात्री ८.५० वाजता सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात येणार आहे. रविवारी पहाटे ४.३८ वाजता चर्चगेट-बोरिवली लोकल रद्द करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११.३० ची विरार-चर्चगेट लोकल वेळापत्रकानुसार रात्री १.१० वाजता चर्चगेटला पोहोचेल. शनिवारी विरारवरून चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल.
मुंबई सेंट्रल – चर्चगेटदरम्यान काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री १२.१० वाजता बोरिवली – चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. त्यानंतर मुंबई सेंट्रल – चर्चगेटदरम्यान ही लोकल रद्द राहील. शनिवारी रात्री ११.४९ वाजता विरार-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल मुंबई सेंट्रल – चर्चगेटदरम्यान रद्द राहील. शनिवारी रात्री १२.३० वाजता बोरिवली-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल मुंबई सेंट्रल – चर्चगेटदरम्यान रद्द राहील. शनिवारी रात्री १२.०५ वाजता विरार-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल मुंबई सेंट्रल – चर्चगेटदरम्यान रद्द राहील. रविवारी पहाटे ४.१५ वाजता चर्चगेट-विरार लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल मुंबई सेंट्रलवरून पहाटे ४.२५ वाजता सुटेल. रविवारी पहाटे ४.१८ वाजता चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेट – मुंबई सेंट्रल दरम्यान अंशत: रद्द असेल. ही लोकल मुंबई सेंट्रलवरून पहाटे ४.२८ वाजता सुटेल.
दादर स्थानकातील पादचारी पूल बंद
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील पादचारी पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामानिमित्त पादचारी पुलाच्या जिनाच्या पायऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. या कालावधीमध्ये प्रवाशांनी इतर पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गोरेगाव स्थानकातील पूल बंद
पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकातील उत्तर दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचे तोडकाम आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पादचारी बंद करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा पूल बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीमध्ये उत्तर दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.