मुंबई : गेल्या नऊ वर्षांत ४ हजारांहून अधिक जागा वाढवूनही वैद्यकीय प्रवेशातील स्पर्धेचा ताण कमी झालेला नाही. वाढलेल्या जागा पटकवण्यात विद्यार्थ्यांना मोठ्या चुरशीचा सामना करावा लागत असून, दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयातील जागा क्षणात भरत आहेत. सलग नऊ वर्षे राज्यातील एमबीबीएसची एकही जागा रिक्त राहिलेली नाही.
देशातील डॉक्टरांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. त्यानुसार काही वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय अभ्याक्रमांच्या जागांमध्ये वाढ करण्यात येत आहे. मागील नऊ वर्षांमध्ये राज्यामध्ये ४ हजार ४४ जागा वाढल्या असल्या तरी दरवर्षी सर्व जागा भरल्या जात असून, अनेक विद्यार्थ्यांना जागेअभावी अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागत आहे. यातून राज्यातील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे कल अधिक असल्याचे दिसून येत आहे.
राज्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबरोबरच अनेक महाविद्यालयांमध्ये जागा वाढही करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ४ हजार ४९१ जागा होत्या. यातील २ हजार ३२० जागांवर मुलांचे, तर १ हजार ८८८ जागांवर मुलींनी प्रवेश घेतले. तर २०२५-२६ पर्यंत या जागांमध्ये तब्बल ४ हजार ४४ ने वाढ करण्यात आली. या नऊ वर्षांमध्ये साधारणपणे एका वर्षाच्या अंतराने हजारच्या आसपास जागा वाढल्या. २०२५-२६ मध्ये राज्यातील जागांची संख्या ८ हजार ५३५ इतकी झाली. या जागांवर यंदा राज्यभरातील ४ हजार ४९५ मुलांनी, तर ४ हजार ४० मुलींनी प्रवेश घेतले.
वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने मागील काही वर्षांमध्ये सातत्याने जागांमध्ये वाढ होत असूनही सर्व जागांवर प्रवेश होत आहेत. नीट गुणांच्या आधारे देशभरातील आघाडीच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा मिळवण्याची धडपड यंदाही तीव्र होती. पहिल्या फेरीत शेकडो जागा रिक्त असताना विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम वारंवार बदलणे, पुनर्निवडीतील वाढलेली हालचाल, मुक्त फेरीत महाविद्यालयांनी दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे अंतिम टप्प्यात सर्व जागांची भरल्या.
—————————————-
प्रवेश घेतलेले विद्यार्थी
——————————————————
वर्ष – जागा – पुरुष – महिला
——————————————————
२०२५-२६ – ८५३५ – ४४९५ – ४०४०
२०२४-२५ – ८१४१ – ४३४४ – ३७९७
२०२३-२४ – ७३२४ – ४००४ – ३३२०
२०२२-२३ – ६८५४ – ३७२९ – ३१२५
२०२१-२२ – ६७१९ – ३७१० – ३००८
२०२०-२१ – ५८९३ – ३३८३ – २७२८
२०१९-२० – ५७८५ – ३३६२ – २४२३
२०१८-१९ – ४५९९ – २४७० – २१२९
२०१७-१८ – ४४९१ – २३२० – १८८८
