नायगाव बीडीडी चाळीतील नऊ ‘शौचालये’ ही लाभार्थी!

‘म्हाडा‘कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप

‘म्हाडा‘कडून सध्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या पुनर्विकासात प्रत्येक रहिवाशाला ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. घराच्या आशेने सार्वजनिक बांधकाम विभागातील नऊ कर्मचाऱ्यांनी चक्क या चाळीत असलेली ‘शौचालये‘ आपल्या नावावर करून घेतली आहेत. त्यामुळे ही ‘शौचालये‘ही आता या योजनेत लाभार्थी ठरली आहेत. म्हाडाने या बाबीची गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.

‘म्हाडा‘कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. नायगाव येथील पात्रता यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केली आहे. या यादीत चाळीतील नऊ शौचालयांच्या जागी खोल्या दाखवून त्यांचे भाडेकरू म्हणून चक्क नावांची नोंद असल्यामुळे रहिवासीही अवाक्  झाले.

या खोल्यांच्या नावे वीजेचे मीटर, भाडेपावत्याही असल्याची बाबही उघड झाली आहे. नायगाव बीडीडी चाळ रहिवाशी संघटनेने या बाबत म्हाडाकडे रीतसर तक्रार केली. या चाळीत सामाईक शौचालये होती. परंतु पाणी नसल्यामुळे या शौचालयांच्या वापर होत नव्हता. त्यामुळे ही जागा बंदिस्त करून घेऊन खेळण्यासाठी वा अभ्यासाची खोली म्हणून वापरली जात होती. पुनर्विकास प्रकल्प जाहीर झाला आणि देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकल्पासाठी पात्रता यादी सादर करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली होती. या यादीची शहानिशा नायगाव विभागाच्या उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) यांनी केली. या यादीत शौचालयाऐवजी निवासी घरे दाखविण्यात आली होती तसेच ही घरे चाळीची देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावे असल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक भोसले याबाबत अधिक तपास करीत आहेत.

वरळीतही तीन खोल्या लाटल्या!

वरळी येथील पुनर्विकास प्रकल्पात पालिका शाळेच्या सात खोल्या होत्या. त्यापैकी तीन खोल्या विकण्यात आल्याची गंभीर बाबही उघड झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

‘शौचालय वजा घरा’चे लाभार्थी

एस. बी. अहिरे, सी. डी. नलावडे, वाय एम पिंजारी, आर डी धनविजय, एम वाय घाणेश्वर, एम डी घोडे, ए ए देसाई, ए एस माने, एस आर सोनावणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nine employees of the pwd have taken this toilets in their name

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या