मुंबई : राज्यात ‘बीए.५’चे सहा आणि ‘बीए.४’चे तीन नवे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे येथील असून या दोन्ही उपप्रकारांच्या रुग्णांची संख्या आता ७३ झाली आहे.

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय अहवालामध्ये आणखी नऊ रुग्णांना ‘बीए.५’ आणि ‘बीए.४’ची बाधा झाल्याचे आढळले. या रुग्णांना २१ ते २९ जून या काळात करोनाची बाधा झाली होती. हे सर्व रुग्ण लक्षणविरहित आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या ७३ झाली असून यापैकी पुण्यात २४, मुंबईत ३४, नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४, तर रायगडमध्ये ३ रुग्ण आढळले. ‘बीए.२.७५’चे दहा रुग्ण, ‘बीए.२.७५’ या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचे रुग्णही या अहवालात आढळले. पुण्यामध्ये ‘बीए.२.७५’ चे दहा रुग्ण आढळले आहेत.

राज्यात सात रुग्णांचा मृत्यू

राज्यात बुधवारी ३ हजार ९७४ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ३ हजार १४२ नवे बाधित आढळले. राज्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली. रायगड, सोलापूर पालिका येथे प्रत्येकी दोन, तर वसई-विरार, नंदुरबार, औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. राज्यात बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या २० हजारांच्याही खाली आहे.