‘आयआयटी मद्रास’ अव्वल स्थानी; डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाला दंतशास्त्र श्रेणीत तिसरे स्थान

मुंबई : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) सोमवारी जाहीर केली असून गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘एनआयआरएफ’च्या सर्वसाधारण क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘आयआयटी मद्रास’ने उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी आयआयएससी बंगळुरू आहे, तर आयआयटी मुंबईला मागे टाकत तिसऱ्या स्थानी ‘आयआयटी दिल्ली’ने बाजी मारली आहे. यंदा ‘आयआयटी मुंबई’ला चौथे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई व्यतिरिक्त मुंबईतील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेला व्यवस्थापन श्रेणीमध्ये सातवे, रसायन तंत्रज्ञान संस्थेला (आयसीटी मुंबई) औषधशास्त्र श्रेणीमध्ये पाचवे आणि पुण्यातील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाने दंतशास्त्र श्रेणीमध्ये तिसरे स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) ही सर्वसाधारण, विद्यापीठे, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, महाविद्यालय, औषधशास्त्र, वैद्यकीय, वास्तुशास्त्र आणि नियोजन, विधि, दंतशास्त्र, संशोधन संस्था, कृषी आणि संलग्न क्षेत्रे या श्रेणींमध्ये जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण क्रमवारीत आयआयटी मुंबईची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण झाली असली, तरीही इतर श्रेणींमध्ये या संस्थेने चमकदार कामगिरी केली आहे. ‘आयआयटी मुंबई’ने सर्वसाधारण श्रेणीमध्ये चौथे, अभियांत्रिकीमध्ये तिसरे, व्यवस्थापनामध्ये दहावे, संशोधन संस्थांमध्ये चौथे स्थान पटकावत एनआयआरएफ क्रमवारीत स्वत:चा दबदबा कायम ठेवला आहे.

सर्वोत्तम दहा विद्यापीठांत राज्यातील एकही नाही

देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाष्ट्रातील एकाही विद्यापीठ व महाविद्यालयाचा समावेश नाही. विद्यापीठ श्रेणीमध्ये मुंबईतील होमी भाभा राष्ट्रीय संस्था गतवर्षीप्रमाणे यंदाही १७ व्या स्थानी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची १२ व्या स्थानावरून १९ व्या स्थानी घसरण झाली आहे, तर रसायन तंत्रज्ञान संस्था १४ व्या स्थानावरून २३ व्या स्थानी पोहोचली आहे. सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ ३२ व्या स्थानी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ४६ व्या आणि भारती विद्यापीठ ९१ व्या स्थानी आहे. मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ४७ व्या स्थानी आहे. मुंबई विद्यापीठ ५६ व्या आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस ९८ व्या स्थानी आहे. महाविद्यालय श्रेणीमध्ये मुंबईतील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय ५७ व्या स्थानी आणि पुण्यातील फग्र्युसन स्वायत्त महाविदयालय ७९ व्या स्थानी आहे.

विविध श्रेणीनुसार अव्वल महाविद्यालये व विद्यापीठे 

’  सर्वसाधारण  – आयआयटी मद्रास

’  विद्यापीठ – भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू 

’  अभियांत्रिकी – आयआयटी मद्रास

’  व्यवस्थापन- आयआयएम अहमदाबाद

’  महाविद्यालय – मिरांडा हाऊस, दिल्ली

’  औषधशास्त्र – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद

’  वैद्यकीय – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली

’  वास्तुशास्त्र आणि नियोजन – आयआयटी रुरकी 

’  विधी – भारतीय राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एनएलएसआययू), बंगळुरू 

’  दंतशास्त्र – सवीथा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस, चेन्नई

’  संशोधन संस्था – भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू 

’  कृषी आणि संलग्न क्षेत्रे – भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली

सर्वोच्च १० विद्यापीठे

’  भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

’  जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

’  जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

’  जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता

बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

’  मणिपाल उच्च शिक्षण अकादमी, मणिपाल

’  अमृता विश्व विद्यापीठम, कोईम्बतूर

’  वेल्लोर तंत्रज्ञान संस्था, वेल्लोर

’  अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ ’ 

हैदराबाद विद्यापीठ , हैदराबाद

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirf ranking 2023 released iit bombay secured fourth position mumbai print news zws
First published on: 06-06-2023 at 04:31 IST