‘निर्माण’कडून ८७३ सामाजिक कार्यकर्त्यांची फौज!

चाकोरीबाहेरील वाटेवर चालणाऱ्या नव्या पिढीची निर्मिती

डॉ. अभय व राणी बंग यांचा उपक्रम; चाकोरीबाहेरील वाटेवर चालणाऱ्या नव्या पिढीची निर्मिती

उच्च शिक्षण आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायची त्याची इच्छा होती. गडचिरोली येथील डॉ. अभय व राणी बंग यांच्या ‘निर्माण’ संस्थेच्या उपक्रमातून सामाजिक कार्याचा एक वेगळा अर्थ त्याला गवसला. ‘जीवनाच्या शिक्षणाचे मूल्य’ खऱ्या अर्थाने उमगले. यातून डॉ. गजानान याने दुर्गम भागात रुग्णसेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. पैसा व प्रतिष्ठेच्या मागे न धावता सामाजिक बांधिलकीची वेगळी वाट चोखाळणारे शेकडो युवक ‘निर्माण’ने गेल्या दशकात घडवले आहेत. आपला मुलगा डॉक्टर अथवा इंजिनीयर न होता समाजसेवक व्हावा असे किती पालकांना वाटते याची कल्पना नाही, तथापि ‘निर्माण’मुळे या वाटेवरून चालण्याची प्रेरणा आज शेकडो तरुणांना होत आहे.

महाराष्ट्रतील युवकांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे व त्यातून परिवर्तन घडविणारी व्यवस्था ‘निर्माण’ करावी या हेतूने डॉ. अभय व राणी बंग यांनी जून २००६ मध्ये ‘निर्माण’ची स्थापना केली आहे.

सध्या ‘निर्माण’च्या कार्याची धुरा डॉ. राणी व अभय बंग यांचा मुलगा अमृत व त्यांचे पाच सहकारी सांभाळत आहेत. अमेरिकेतून व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अमृत बंग यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत साठ टक्के मुले व चाळीस टक्के मुलींनी ‘निर्माण’चा अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे. यातील ३५ टक्के वैद्यकीय क्षेत्रातील तर ३० टक्के हे अभियांत्रिकी शाखेतील होते. आठ दिवसाच्या तीन कार्यशाळा यासाठी घेतल्या जातात. यात नेमके काय करायचे आहे हे समजून घेण्यासाठी आधी स्वत:ची ओळख करून घेतली जाते. सामाजिक कार्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी विचारांची खोली व रुंदी वाढविण्याबरोबरच बौध्दिक बैठक तयार करण्यावर भर दिला जाते. त्यानंतर गडचिरोलीतील दुर्गम गावातील एखाद्या झोपडीत आदिवासींबरोबर काही काळ राहावेही लागते. मोठय़ा संख्येने तरूण सामाजिक कार्याकडे वळू पाहात असल्यामुळे ‘निर्माण’मधील प्रवेश आता सोपा राहिलेला नाही. त्यामुळे ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांना १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुलाखत वगैरे पार पडून त्यातून दीडशे तरुणांची निवड केली जाते.

यावेळीही ‘निर्माण’कडे मोठय़ा संख्येने तरुणांचे अर्ज येत असून १५ ऑगस्ट ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये राज्यभरात मुलाखती होऊन १५ ऑक्टोबरला निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल, असे अमृत बंग यांनी सांगितले. सामान्यपणे डॉक्टर, अभियंता, अभिनेता अथवा राजकारण्यांची मुले आपल्या वडिलांचाच पेशा स्विकारताना दिसतात. तथापि ‘निर्माण’मुळे समाजसेवेच्या चाकोरीबाहेरील वाटेवर चालणाऱ्या युवकांची पिढीच आता दरवर्षी ‘निर्माण’ होऊ लागली आहे.

डॉक्टर, वकील, अभियंते यांचा सहभाग

२०१६ पासून सातत्याने मोठय़ा संख्येने उच्चशिक्षित तरुण या प्रशिक्षण उपक्रमात सामील होत आहेत. गेल्या दहा वर्षांत सात प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून तब्बल ८७३ तरुण-तरुणींनी सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंते, संगणकतज्ज्ञ, व्यवस्थापन शिक्षण घेतलेली तसेच वेगवेगळ्या शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या १८ ते २८ वयोगटाच्या तरुणांचा समावेश आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nirman sanstha social work abhay and rani bang

ताज्या बातम्या