सासू-सुनेचं नातं हे सदाबहार असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवेफुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्याची एक वेगळी गोष्ट ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेला, वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आलं.
सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने ‘कप बशी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे. चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत यांच्यासह अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर आणि आनंद काळे अशी उत्तमोत्तम कलाकारांची फौज आहे. गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रकल्प प्रमुख म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिलं आहे.
अरुण आणि अरुणा हे दाम्पत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात, परंतु अरुणा यांच्या आध्यात्मिक गुरूने सुनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत. त्या अटींनुसार अरुणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? नक्की अशी कोणती अट आहे? अशा धमाल आशयसूत्रावर ‘कप बशी’ हा चित्रपट आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक पद्धतीने कथानक मांडण्यात आलं आहे. हा मनोरंजक चित्रपट पाहण्यासाठी ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
