मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्याविरुद्ध नुकतेच जामीनपात्र वॉरंट काढले. यापूर्वीही याच कारणास्तव नितेश यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.

नितेश यांच्याविरोधात राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणावर माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे. तसेच, नितेश यांचा जबाब नोंदवायचा असून त्यांनी न्यायालयात उपस्थित राहून जबाब नोंदवणे आवश्यक होते, परंतु ते वारंवार सुनावणीसाठी अनुपस्थित राहत आहेत.

यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध दोनवेळा जामीनपात्र वॉरंट आणि एक अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. तथापि, न्यायालयातील त्यांच्या उपस्थितीनंतर ते न्यायालयाने रद्द केले होते ही बाब राऊत यांच्या वकिलातर्फे सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगण्यात आली. हे प्रकरण खासदाराशी आणि आमदाराशी संबंधित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होणे आवश्यक आहे, असा युक्तिवादही राऊत यांच्यातर्फे करण्यात आला.

अनुपस्थितीच्या वर्तणुकीवर न्यायालयाचे बोट

न्यायालयानेही नितेश हे सुनावणीच्या अनेक तारखांना अनुपस्थित राहिल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. नितेश यांच्या वतीने त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित राहत असले, तरी त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे नितेश यांनी स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले व नितेश यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले. तसेच, प्रकरणाची पुढील सुनावणी १० जून रोजी निश्चित करून त्या दिवशी नितेश हे राणे न्यायालयात उपस्थित राहतील, अशी अपेक्षा न्यायालयाने सुनावणी स्थगित करताना व्यक्त केली.

प्रकरण काय?

तीन वर्षांपूर्वी, राणे यांनी राऊतांना साप म्हणून संबोधले होते. तसेच, राऊत हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असा आरोप केला होता. त्यानंतर, राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती व बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नितेश यांचा हा दावा त्यावेळी फेटाळून लावला होता.