केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्याला मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. ही नोटीस रद्द करण्यासाठी आता नारायण राणेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेच्या नोटीसीविरोधात नारायण राणेंनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट करत या प्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस पाठवली होती. दिलेल्या मुदतीत जर हे बांधकाम हटवलं गेलं नाही तर पालिकेकडून यावर कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं होतं. आता या नोटीशीचा कालावधी संपत आला असल्याने, त्यामुळे या कारवाईला स्थगिती मिळावी आणि ही नोटीस रद्द करावी अशी मागणी करत नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जे दुसरी मातोश्री बांधत आहेत त्यांच्या सर्व गोष्टी अधिकृत आहेत का असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. “नोटीसला कायदेशीर उत्तर देण्याचे आमचे काम सुरु आहे. जे दुसरी मातोश्री बांधत आहेत त्यांच्यापण सगळ्या गोष्टी अधिकृत आहेत का हे येणाऱ्या काळात दिसेल. काय काय काम झाले आहे त्याचे सादरीकरण करण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर देऊ. मग बघू महापालिका ते तोडते की नाही,” असे नितेश राणे म्हणाले.
माझ्या बंगल्याला नोटीस देता, पण ठाकरे यांच्या मातोश्री-२ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का, असा सवाल करत छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच ‘मातोश्री’वरील एक जण तुरुंगात जाईल, असा इशारा नारायण राणे यांनीही दिला होता.
शिवसेना व राष्ट्रवादी दाऊद इब्राहीमची ‘बी’ टीम
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाब मलिक हे दाऊद इब्राहीमशी संबंधित व्यक्तींबरोबर आर्थिक गैरव्यवहार करीत असताना त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दाऊद इब्राहीमची बी टीम आहेत, असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राणे कुटुंबीय सोलापुरात आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय ‘मातोश्री- २’मध्ये करणार गृहप्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नवीन निवासस्थान असलेल्या मातोश्री २ चे काम सध्या सुरू आहे. मुंबईतील वांद्रे-कलानगर येथील मातोश्री बंगल्यासमोर ही आठ मजली इमारत बांधण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबीय मातोश्री-२ मध्ये राहायला जाणार असल्याचे बोलले जात आहे.