मुंबई : ‘इथेनॉल-मिश्रित इंधन धोरणा’शी (इ – २०) संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतचा आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ‘एक्स’सह अन्य समाजमाध्यम व्यासपीठांना बुधवारी पुन्हा एकदा दिले. यावेळी नवीन मजकूर हटवण्याचेही न्यायालयाने या समाजमाध्यमांना आदेश दिले.
गेल्या ५ ऑगस्ट रोजी स्पष्ट आदेश देऊनही गडकरी यांच्याबाबतचा काही आक्षेपार्ह मजकूर, विशेषतः ‘एक्स’वरील मजकूर अद्याप हटवण्यात आलेला नाही, असे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘एक्स’ला याबाबत प्रतिज्ञापत्र आणि आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ५ ऑगस्ट रोजी गडकरी यांनी याचिकेसह सादर केलेला सर्व आक्षेपार्ह मजकूर सकृतदर्शनी बदनामीकारक असल्याचे आढळून आल्यानंतर न्यायालयाने तो काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तथापि, बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी, ‘एक्स’ने अद्याप त्या आदेशाचे पालन केलेले नाही, तर इन्स्टाग्रामसारख्या इतर समाजमाध्यम व्यासपीठांनी आक्षेपार्ह मजकूर आधीच काढून टाकला आहे, असे गडकरी यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
न्यायालयाने त्याची दखल घेऊन, ‘एक्स’ला गडकरी यांच्याविरुद्धचा सर्व आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले. तसेच, गडकरी यांनी आपल्या वकिलांमार्फत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेला नवीन आक्षेपार्ह मजकूरही काढून टाकण्याचे आदेश संबंधित समाजमाध्यम व्यासपीठांना दिले व प्रकरणाची सुनावणी १६ सप्टेंबर रोजी ठेवली.
