मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५७ रहिवाशांची हक्काच्या घराची तब्बल सात वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या तीन पुनर्वसित इमारतींतील ५५७ घरांचा ताबा ६ नोव्हेंबरला, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होईल. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ५५७ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींची कामे सुरू असून जसजशा इमारती तयार होत आहेत, तसतशा त्या इमारतींना निवासी दाखला प्राप्त करून घेत घरांचा ताबा दिला जात आहे. त्यानुसार वरळीतील अंदाजे १४०० आणि नायगावमधील अंदाजे १४०० घरांचा ताबा देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबली होती.
याच चाळीतील रहिवाशांनी बीडीडी चाळ पुनर्विकासाला समर्थन देत घरे रिकामी करून दिली होती. मात्र याच रहिवाशांना हक्काच्या घरासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. पण अखेर या प्रकल्पातील तीन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करून काही दिवसांपूर्वी मुंबई मंडळाने या इमारतींना निवासी दाखला प्राप्त करून घेतला. निवासी दाखला प्राप्त झाल्यानंतर लागलीच घरांचे वाटप होईल असे वाटत असताना मागील एक-दीड महिन्यांपासून चावी वाटपाला मुहूर्त लागत नव्हता.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावी वाटप रखडले होते. पण आता मात्र चावी वाटपाला मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी, ६ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ५५७ घरांचे प्रातिनिधिक स्वरूपात चावी वाटप केले जाणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी १२ वाजता चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी काही रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात चावी वाटप केले जाणार आहे. ऐन दिवाळीत ५५७ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने ही बाब त्यांच्यासाठी दिलासादायक मानली जात आहे.गेली अनेक वर्षे आम्ही बीडीडी चाळीतील छोट्याशा घरात अनेक अडचणी सहन करत आयुष्य काढले.
पण अखेर आता आमचे मोठ्या आणि हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे, ही आम्हा सर्व रहिवाशांसाठी आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ज्येष्ठ रहिवासी सुनील धारपवार यांनी दिली. तर आम्ही गैरसोयीत आमचे आयुष्य घालवले. पण आता मात्र आमची मुले सुखकर, मोठ्या, उत्तुंग इमारतीतील घरामध्ये आयुष्य घालवणार आहेत, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे, असे येथील रहिवासी मालिनी ज्ञानेश्वर तेजम यांनी सांगितले.
सात वर्षांहून अधिक काळ या चाळीतील रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहोत, आम्हाला आमच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा होती. अखेर आता ५५६ रहिवाशांची प्रतीक्षा संपणार असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर आता उर्वरित इमारतींच्या कामालाही वेग देत लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी ना.म.जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केली आहे.
