मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात आली आहे. तर नायगाव बीडीडी चाळवासीयांनाही एका घरामागे एक लागनचश देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. त्याचवेळी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना मात्र दोन घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात आली आहे. आम्हालाही वरळी, नायगावप्रमाणे एका घरामागे एक अशी वाहनतळाची जागा द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकार आणि म्हाडाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून आता त्यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वात आधी घरे रिकामी
सुमारे ११ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ वसली आहे. यात ३२ चाळी असून या चाळींच्या पुनर्विकासाअंतर्गत २५६० रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सर्वात आधी या चाळींतील रहिवाशांनी समर्थन देत इमारती रिकाम्या केल्या. त्यानंतर या इमारतींचे पाडकाम करून तेथे पुनर्वसित इमारती बांधण्यास सुरुवात करण्यात आली. सर्वात आधी घरे रिकामी करणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळवासीयांनी हक्काच्या घरासाठी सर्वाधिक प्रतीक्षा करावी लागत आहे.
वरळी आणि नायगावमधील रहिवाशांना पुनर्वसित इमारतीतील हक्काची घरे देण्यास टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली. मात्र ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांना अद्यापही घराचा ताबा देण्यात आलेला नाही. पहिल्या टप्प्यातील ५३७ घरांच्या ताब्यासाठी तारखांवर तारखा दिल्या जात असून आता जूनचा मुहूर्त देण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तर दुसरीकडे येथील रहिवाशांना दोन घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात येत असल्याने नाराजीत आणखी भर पडली आहे.
वाहनतळासाठी स्वतंत्र इमारत बांधावी
वरळीमध्ये एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात आली आहे. तर नायगाववासीयांना एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८६४ घरांच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमात दिले आहे. दुसऱ्या टप्प्यात वाहनतळासाठी स्वतंत्र इमारत बांधून त्यांचा हा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. वरळी, नायगावला एका घरामागे एक वाहनतळाची जागा उपलब्ध होत असताना ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांवरच अन्याय का, असा प्रश्न ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी उपस्थित केला आहे.
यासंबंधी सातत्याने मागणी करण्यात येत आहे, मात्र राज्य सरकार आणि म्हाडा याकडे लक्ष देत नाही. नायगावप्रमाणे ना. म. जोशी मार्ग येथेही वाहनतळासाठी स्वतंत्र इमारत बांधावी, अशी आमची मागणी आहे. पुनर्विकासामध्ये असा भेदभाव का, प्रकल्प एकच आहे, तर मग वेगवेगळे नियम का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याविषयी मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकला नाही. मात्र यासंबंधी मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात, असे सांगून अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवले.
