मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील ५५६ रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला असून आता नायगावमधील ८६४ रहिवाशांना ताबा देण्याची प्रक्रिया म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू केली आहे. मात्र त्याचवेळी पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वात आधी पुढाकार घेत घरे रिकामी करून म्हाडाच्या संक्रमण शिबिरात वास्तव्यास जाणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवासी मात्र अजूनही ५०० चौ. फुटांच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत.

ना. म. जोशी मार्ग चाळीतील पुनर्वसित इमारतींचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने घराची प्रतीक्षा लांबत असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. पहिल्या टप्प्यातील ५३७ घरांचा ताबा एप्रिल २०२६ मध्ये देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुंबई मंडळाने आता या घरांच्या ताब्यासाठी जून २०२६ ही नवीन तारीख दिली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून प्रकल्पाच्या कामाला वेग देऊन लवकरात लवकर घरांचा ताबा देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ ११ एकर जागेवर वसली होती. येथील ३२ चाळीमध्ये २५६० सदनिका होत्या. पुनर्विकासाअंतर्गत २०१९ मध्ये एक-एक चाळ रिकामी करून त्यांचे पाडकाम करून त्यावर पुनर्वसित इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, बीडीडी चाळ पुनर्विकासाला ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव या तिन्ही ठिकाणी सुरुवातीला काही कारणाने रहिवाशांचा विरोध होता. घरे रिकामी करण्यास रहिवाशांकडून नकार दिला जात होता. परिणामी, काम सुरू करण्यास विलंब होत होता.

ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी सर्वप्रथम पुनर्विकासाला समर्थन देऊन पुढाकार घेऊन २०१९ मध्ये ३०० घरे रिकामी केली. या ३०० रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात हलविण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चाळी रिकामी करून त्यावर पुनर्वसित इमारतींची कामे हाती घेण्यात आली. येथे २२ मजली १४ पुनर्वसित इमारती बांधून त्यात २५६० रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सात पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. सातपैकी तीन पुनर्वसित इमारतींमधील ५३७ घरांचा ताबा डिसेंबर २०२५ मध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र या घरांचे कामच पूर्ण न झाल्याने रहिवाशांना संक्रमण शिबिरातच राहावे लागत आहे.

पुनर्वसित इमारतीतील ५३७ घरांचा ताबा डिसेंबर २०२५ मध्ये देण्याचे जाहीर करणाऱ्या मंडळाने पुढे एप्रिल २०२६ मधील तारीख ताब्यासाठी दिली. त्यामुळे एप्रिलमध्ये घरांचा ताबा मिळेल या आशेवर ५३७ रहिवासी होते. मात्र ना. म. जोशी मार्ग येथील ५३७ घरांचा ताबा जून २०२६ मध्ये देण्यात येईल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नायगाव बीडीडीतील ८६४ घरांच्या चावी वाटप कार्यक्रमात जाहीर केल्याने रहिवाशांचा भ्रमनिरास झाला आहे. मंडळाकडून ताब्यासाठी तारखांवर तारखा दिल्या जात असल्याने रहिवासी नाराज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करून ताबा देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. तर त्याचवेळी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाकडे राज्य सरकारसह म्हाडा अधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप केला आहे.

आमच्या चाळीतील पुनर्विकासाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. आमच्या नंतर घरे रिकामी करण्यास, इमारतींचे पाडकाम करण्यास सुरुवात झालेल्या दोन चाळीतील काही पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण होऊन रहिवासी ५०० चौ. फुटाच्या घरात राहण्यास गेले. आम्ही मात्र अंदाजे ८०० रहिवासी संक्रमण शिबिरातच आहोत. आम्हाला ताब्यासाठी म्हाडाकडून केवळ तारखांवर तारखा मिळत आहेत. आता तरी म्हाडाने, सरकारने आमच्या येथील कामाकडे लक्ष द्यावे आणि कामाला वेग द्यावा हीच आमची मागणी आहे. – हेमंत कालवणकर, रहिवासी

आम्ही सात वर्षे संक्रमण शिबिरात राहत आहोत. आमच्या हक्काच्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हाच प्रश्न आम्हाला पडला आहे. ना. म. जोशी मार्गच्या कामाकडे अधिकारी साफ दुर्लक्ष करत आहेत. प्रकल्पस्थळी अधिकारी येत नाहीत, केवळ बैठकांमध्ये कामाचा आढावा घेतात. कामास विलंब होत असून कामाचा वेग देण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. म्हाडा लक्ष देत नसल्याने आम्ही सरकारकडेही याविषयी तक्रारी केल्या आहेत, मात्र सरकार दरबारीही आम्हाला न्याय मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. वरळीप्रमाणे आम्हालाही एका घरामागे एक वाहनतळाची जागा मिळावी यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र ही मागणीही मान्य होताना दिसत नाही. आता एप्रिलमध्ये मिळणारा ५३७ घरांचा ताबा जूनमध्ये दिला जाणार असल्याने रहिवाशांमधील नाराजी आणखी वाढली आहे. – कृष्णकांत नलगे, अध्यक्ष, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समिती