मुंबई : वैद्यकीय पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमधील चिकित्सा (क्लिनिकल) आणि जैववैद्यकीय संशोधनाचा आवाका वाढवा यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) तत्त्वांचा वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे एमबीबीएस, एमडी, एमएस आणि पीएचडी या अभ्यासक्रमांमध्ये आयसीएमआरच्या तत्त्वांचा समावेश करण्यात येणार आहे.

वैद्यकीय संशोधनाबाबत विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, अंधत्व, मधुमेह व इतर मेटाबॉलिक आणि हेमॅटॉलॉजिकल विकार. मानसिक आरोग्य संशोधन, तसेच औषध संशोधन या क्षेत्रांमध्ये संशोधनाभिमुख वैद्यकीय शिक्षणाची मजबूत चौकट उभारण्याच्या उद्देशाने वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये आयसीएमआरच्या तत्त्वांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला एनएमसीच्या बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय आणि जैववैद्यकीय संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच भारताची वैद्यकीय संशोधन परिसंस्था बळकट करून नवोन्मेषाधारित आरोग्यसेवा उपायांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.

बोर्डाच्या मंजुरीअभावी आयसीएमआर तत्त्वे वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र या मंजुरीने आयसीएमआर तत्त्वांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा पहिला टप्पा पार पडला आहे. भविष्यात विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये क्लिनिकल संशोधन घटक पद्धतशीरपणे कसे समाविष्ट करता येतील याबाबत विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

समितीकडून अभ्यासक्रम अंतिम करून झाल्यानंतर सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना ते अंमलात आणणे बंधनकारक असणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या क्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण चौकटीअंतर्गत एनएमसीकडून वैज्ञानिक विचारसरणी, विश्लेषणात्मक विचार आणि संशोधन साक्षरता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार आणि नवोन्मेष करण्याची कौशल्ये व क्षमता देऊन संस्थांमध्ये क्लिनिकल आणि जैववैद्यकीय संशोधनाचा आवाका वाढवणे, तसेच क्षेत्राधारित नवकल्पनांद्वारे आधुनिक वैद्यकशास्त्र घडवणे आणि बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.

आयोगाने पदव्युत्तर निवासी डॉक्टर आणि प्राध्यापकांसाठी बायोमेडिकल रिसर्च या विषयावरील मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य केले होते. हा अभ्यासक्रम आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.

समितीमध्ये कोणाचा समावेश असेल

आयसीएमआरच्या मार्गदर्शनाखाली मजबूत संशोधन परिसंस्था आणि प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये नामवंत डॉक्टर व नीती आयोगाच्या एक सदस्याचा समावेश असणार आहे.