मुंबई : परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाकडून (एनबीईएमएस) ही परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. या पात्रता प्रमाणपत्रासाठी २ मार्चपासून एनएमसीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करता येणार आहे.

भारतामध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात. मात्र या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना व्यवसाय करण्यासाठी भारतामध्ये पुन्हा यावे लागते. या विद्यार्थ्यांना भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. एफएमजीई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे एनएमसीने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्याला परीक्षा देता येत नाही.

पुढील काही महिन्यांमध्ये एनबीईएमएसकडून परीक्षाचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्रता प्रमाणपत्रासाठी एनएमसीच्या संकेतस्थळावर २ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे एनएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

फाईल ट्रॅकिंग क्रमांक बंधनकारक

अर्ज सादर केल्यानंतर निर्माण होणारा फाईल ट्रॅकिंग क्रमांक जतन करून ठेवणे अत्यावश्यक आहे. पात्रता अर्जाच्या स्थितीबाबत चौकशी करताना संबंधित ई-मेल आयडीवर संपर्क साधताना हा क्रमांक नमूद करणे अनिवार्य राहणार आहे. फाईल ट्रॅकिंग क्रमांकाशिवाय आलेल्या चौकशींना कोणताही प्रतिसाद दिला जाणार नाही, असे एनएमसीने स्पष्ट केले आहे.

अर्ज प्रक्रियेत चुका टाळण्याचे आवाहन

अर्ज शक्यतो उमेदवाराने स्वतः भरावा; प्रतिनिधीमार्फत अर्ज टाळावा. अर्ज भरण्यापूर्वी सर्व मूळ कागदपत्रे जवळ ठेवून त्यातील माहितीची पडताळणी करूनच नोंदी कराव्यात. सक्रिय मोबाइल क्रमांक नोंदवावा, जेणेकरून त्रुटी किंवा सूचना थेट उमेदवारापर्यंत पोहोचतील. त्रुटी कळविल्यानंतर त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करावे, अन्यथा अंतिम क्षणी अडचणी निर्माण होऊ शकतात. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व नोंदी मूळ कागदपत्रांशी सुसंगत असल्याची खात्री करावी, जेणेकरून अर्जाच्या जलद प्रक्रियेस मदत होईल.