मुंबई : शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा लाभ घेण्यासाठी अनेक शिक्षक व डॉक्टर हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची (एनएमसी) मान्यता नसलेल्या वैद्यकीय संस्थांमधील अनुभव प्रमाणपत्रे सादर करतात. मात्र आता मान्यता नसलेल्या वैद्यकीय संस्थांमधील अनुभव प्रमाणपत्रे रद्दबातल ठरविण्याचा निर्णय एनएमसी घेतला आहे. त्यामुळे बेकायदा संस्थांमधून अनुभव प्रमाणपत्र घेऊन शैक्षणिक व प्रशासकीय लाभ घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भवितव्य संकटात सापडणार आहे.
पदव्युत्तर शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळावी, प्राध्यापक म्हणून नियुक्ती किंवा पदोन्नतीचा लाभ घेता यावा यासह अनेक शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा लाभ घेण्यासाठी शिक्षक व डॉक्टरांना पदव्युत्तर प्रशिक्षण किंवा अध्यापनाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
मात्र झटपट प्रमाणपत्र मिळावे आणि बढती व नवीन नियुक्तीचा लाभ घेता यावा, यासाठी काही प्राध्यापक व डॉक्टर एनएमसीची मान्यता नसलेल्या वैद्यकीय संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विभागांमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणाचे किंवा अध्यापन केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सादर करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात एनएमसीकडे आल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत एनएमसीने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एनएमसीची मान्यता नसलेल्या या संस्थांमधील प्रमाणपत्रे अवैध ठरविण्यात आली आहेत. तसेच या संदर्भात एनएमसीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
एनएमसीने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नियम-२०२३ आणि वैद्यकीय संस्था (शिक्षकांची पात्रता) नियम-२०२५ मधील कलमांच्या आधारे एनएमसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केवळ एनएमसीची मान्यता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील आणि मंजूर पायाभूत सुविधा असलेल्या विभागांमधील अनुभवच ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांमधील ज्या विभागांना ठरावीक जागांसाठी परवानगी दिली आहे, असेच विभाग हे मान्यताप्राप्त समजण्यात येणार असल्याचे एनएमसीकडून स्पष्ट करण्यात आले.
बेकायदा संस्थांमधील प्रमाणपत्र ग्राह्य नाही
मान्यता नसलेल्या संस्थांमधील अनुभव प्रमाणपत्र हे पदव्युत्तर शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील जागेवर नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच प्राध्यापक पदावरील नियुक्ती किंवा पदोन्नती आणि कोणत्याही शैक्षणिक किंवा प्रशासकीय कामांसाठी हे अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
विद्यापीठांवर मोठी जबाबदारी
सर्व विद्यापीठे आणि संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांनी अनुभवाचे प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मान्यतेची पडताळणी एनएमसीच्या नियमानुसार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या विभागामार्फत दिलेले अनुभव प्रमाणपत्र हे कायदेशीररित्या अवैध ठरवण्यात येणार आहे. सर्व संस्थांनी या आदेशाचे तातडीने पालन करावे, तसेच आपल्या सर्व विभागांना याची माहिती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
