‘मी बरी होईन ना,’ असा टाहो फोडणाऱ्या, घाटकोपर अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या तरुणीला रेल्वेतर्फे तातडीने कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या तरुणीने ‘रेल्वे नुकसान भरपाई लवादा’कडे धाव घेतल्यास तो लवाद जो निर्णय देईल, त्यानुसार मग नुकसान भरपाई दिली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. रेल्वेकडे या अपघाताची नोंद ‘रूळ ओलांडताना’ अशी झाली असल्याने या तरुणीला रेल्वेतर्फे  भरपाई मिळणार नाही.
घाटकोपर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर मुंबईच्या दिशेला गाडी थांबते. त्यापुढे काही अंतरावर सिग्नल आणि रेल्वेच्या तांत्रिक यंत्रणेसाठी काही जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. या जागेत पोकळी असून ही पोकळी रेल्वेने जाणीवपूर्वक नियोजन करूनच ठेवली आहे. मात्र ही तरुणी धावत धावत गाडी पकडत असताना या पोकळीत पडली आणि सदर दुर्घटना घडली. धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारची उद्घोषणा वारंवार केली जाते. तरीही असे प्रकार घडल्यास त्याला रेल्वे जबाबदार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेच्या दफ्तरी अशा घटनांची नोंद ‘रूळ ओलांडताना’, अशी केली जाते. रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये नुकसान भरपाई दिली जात नाही.  मात्र या तरुणीने रेल्वे नुकसान भरपाई लवादाकडे धाव घेतल्यास या अपघाताबाबत सुनावणी होईल. त्यानंतर लवादाने सूचना दिल्यास रेल्वे भरपाई देईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Story img Loader