मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेत कोणतीही धूसफूस किंवा नाराजी नाही असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. प्रसारमाध्यमांमध्येच या बातम्या पसरवल्या जात आहेत. शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद नाही. उलट आमच्यामध्ये वाद निर्माण व्हावेत यासाठी काही लोक हेतूपुरस्सर प्रयत्न करत आहेत असाही आरोप रामदास कदम यांनी केला.

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही आज सगळे या ठिकाणी आलो आहोत. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आम्ही त्यांच्यापुढे ठेवला. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर युतीची सत्ता आल्यास भाजपाकडून शिवसेनेला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद मिळणार असेल किंवा उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असेल तर त्याजागी आदित्य ठाकरेंनी विराजमान व्हावं अशीही इच्छा आम्ही व्यक्त केली असंही कदम यांनी म्हटलं आहे. सध्या होणारा मंत्रिमंडळ विस्तार का लांबला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. मात्र यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील तो मान्य आहे असंही कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनीही आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे आणि ते मुख्यमंत्री झाल्यास आवडेल असं म्हटलं आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावं असं म्हटलं आहे.