आर्यनने गुन्हेगारी कट रचल्याचा पुरावा नाही!; जामीन आदेशात उच्च न्यायालयाचे सकृद्दर्शनी मत

आर्यन आणि अन्य दोघांना न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी १४ अटी घालून २९ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता.

मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा सकृद्दर्शनी दिसत नसल्याचे मत उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशात काहीच आक्षेपार्ह नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

आर्यन आणि अन्य दोघांना न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी १४ अटी घालून २९ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आर्यनची आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. आर्यन आणि अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या न्यायमूर्ती सांब्रे यांच्या तपशीलवार आदेशाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली.

षड्यंत्र रचल्याच्या मुद्द्याबाबत आर्यन आणि अन्य दोन आरोपींविरोधात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जे पुरावे सादर केले, त्यावरून या तिघांविरोधात षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा सकृद्दर्शनी दिसत नाही. उलट आतापर्यंतच्या तपासातून आर्यन आणि अरबाज मर्चंट यांनी मुनमुन धमेचाबरोबर नव्हे, तर स्वतंत्रपणे प्रवास केल्याचे तसेच त्यांची तिच्याशी भेट झाली नसल्याचे पुढे आल्याचे न्यायमूर्ती सांब्रे यांनी आपल्या १४ पानी आदेशात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या आरोपींनी षड्यंत्राचा भाग म्हणून व्यावसायिक प्रमाणात अमली पदार्थ बाळगून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हेतुत: गुन्हा केल्याचे मानले जावे हे ‘एनसीबी’चे म्हणणे मान्य करण्यासही न्यायालयाने नकार दिला.

तिन्ही आरोपींनी आधीच जवळपास २५ दिवस तुरुंगवास भोगला आहे आणि त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही हे ठरवण्यासाठी ‘एनसीबी’ने त्यांची वैद्यकीय तपासणीदेखील केली नव्हती, यावर न्यायालयाने बोट ठेवले आहे.

क्रूझवरून प्रवास म्हणजे  षड्यंत्र नाही!

आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ सापडलेले नाही याबाबत दुमत नाही. शिवाय अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अमली पदार्थांचा बेकायदा साठा आढळला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. अशा वेळी तिन्ही आरोपींनी षड्यंत्र रचल्याचा सकृद्दर्शनी पुरेसा पुरावा आहे का? आणि एनसीबी त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवू शकते का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते.

त्याचा विचार करता आरोपी केवळ क्रूझवरून प्रवास करत होते याचा अर्थ त्यांनी बेकायदा गुन्हा करण्याच्या हेतूने कट रचला, असा होत नाही. तसेच एनसीबीचे म्हणणे मान्य केले तरी त्यासाठी  आरोपींना एक वर्षाहून अधिक काळासाठी शिक्षा होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेशांबाबतही एनसीबीला चपराक

आर्यनच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेशांतून त्याने आणि मर्चंट यांनी धमेचा किंवा इतर आरोपींबरोबर गुन्हा करण्याच्या हेतूने कट रचल्याचे सुचवणारे काहीही आढळलेले नाही. शिवाय अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एनसीबीने नोंदवलेला आर्यनचा कबुलीजबाब हा केवळ तपासाच्या उद्देशानेच ग्राह्य धरला जाऊ शकतो. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार आरोपींनी गुन्हा केल्याचे अनुमान काढण्याचे साधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No evidence of criminal conspiracy drugs high court aryan khan akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या